थेट किचनमध्ये आली बंदुकीची गोळी! चिपळूण शहरातील गोवळकोट रोडमधील प्रकार

By संदीप बांद्रे | Updated: June 29, 2025 19:03 IST2025-06-29T19:03:06+5:302025-06-29T19:03:17+5:30

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत याबाबत चौकशी सुरू केली आहे.

A gunshot landed directly in the kitchen! Incident on Gowalkot Road in Chiplun city | थेट किचनमध्ये आली बंदुकीची गोळी! चिपळूण शहरातील गोवळकोट रोडमधील प्रकार

थेट किचनमध्ये आली बंदुकीची गोळी! चिपळूण शहरातील गोवळकोट रोडमधील प्रकार

चिपळूण :शहरातील गोवळकोट रोड परिसरातील तहा लाईफ अपार्टमेंटच्या एका सदनिकेतील किचनमध्ये थेट बंदुकीची गोळी आल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी ११ वाजता घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत याबाबत चौकशी सुरू केली आहे. डुकराच्या शिकारीच्या उद्देशाने हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. 

चिपळूण शहरातील गोळकोट रोड परिसरातील श्रीदेवी करंजेश्वरीच्या कामानीपासून हाकेच्या अंतरावर तहालाईफ अपार्टमेंटच्या मागील बाजूस भात शेतीचे लागवडीचे काम सुरू होते. अशातच या अपार्टमेंट मधील अश्रफ तांबे यांच्या सदनिकेच्या खिडकीतून किचनमध्ये अचानक छऱ्याची गोळी आली. त्यामुळे संबंधित सदनिकेतील महिलांमध्ये घबराट पसरली. त्यांनी तात्काळ पोलीसांशी संपर्क साधून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी काही महिलांनी बाल्कनीतून चार तरुणांना पाहिले, त्यांनी डुकराची शिकार केल्याचे त्याच्या निदर्शनास आले. 

याबाबत तक्रारदार साजिद सरगुरो यांनी माहिती देताना सांगितले की, “मला सकाळी पावणे अकराच्या सुमारास फोन आला की, आमच्या खिडकीतून गोळी आत आली आहे आणि काच फुटली आहे. कोणीतरी इथे शिकार करत असावे असा आमचा अंदाज आहे. आम्ही आवाज दिल्यावर ते पळून गेले.” ते पुढे म्हणाले की, आमच्या बिल्डिंगच्या पाठीमागे शेती आहे, जिथे सध्या भात लावणीचे काम सुरू आहे. याच भागातून ही छऱ्याची गोळी आली असावी. ही गोळी जर काचेला लागली नसती आणि थेट घरात व्यक्तीला लागली असती, तर मोठा अनर्थ घडला असता.

Web Title: A gunshot landed directly in the kitchen! Incident on Gowalkot Road in Chiplun city