खेडमधील गोळीबार प्रकरणात उघडकीस आला वेगळाच प्रकार, पोलिस निरीक्षक भोयर यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 18:34 IST2025-05-26T18:33:25+5:302025-05-26T18:34:13+5:30
खेड : दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्याची माहिती ११२ क्रमांकावर करून पोलिसांची दिशाभूल केल्याची माहिती खेडचे पाेलिस निरीक्षक नितीन ...

संग्रहित छाया
खेड : दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्याची माहिती ११२ क्रमांकावर करून पोलिसांची दिशाभूल केल्याची माहिती खेडचे पाेलिस निरीक्षक नितीन भाेयर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे. याप्रकरणी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गाेळीबार झाला नसून हा बनाव असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
शनिवारी, सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास खेड पोलिसांना रेल्वे स्थानकानजीक खोपी फाटा येथे अज्ञात व्यक्तीने गोळीबार करून गाडीची काच फोडल्याबाबत ११२ क्रमांकावर तक्रार आली होती. त्यानंतर पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, घटनास्थळाची पाहणी आणि प्रत्यक्ष साक्षीदारांच्या चौकशीतून या प्रकरणात वेगळाच प्रकार उघडकीस आला. अपघात लपवण्यासाठी फायरिंगचा बनाव केला गेल्याचे पाेलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी म्हटले आहे.
तपासादरम्यान तक्रारदार आणि त्यांचा मुलगा यांचे जबाब परस्परविरोधी आढळले. तसेच कोणत्याही प्रत्यक्ष साक्षीदारांनी गोळीबार झाल्याचे पाहिले नसल्याचे सांगितले. घटनास्थळी गोळीबाराचे कोणतेही पुरावे जसे की काडतुसे किंवा बंदुकीचे अवशेषही आढळले नसल्याचे म्हटले आहे.
गाडीचा अपघात
एका अनोळखी दुचाकीचा अपघात झाला हाेता. त्या अपघातानंतर वादावादी आणि दगडफेक झाली होती. या प्रकारानंतर तक्रारदार यांनी आपल्या भावाला खोटी माहिती देत फायरिंग झाल्याचा बनाव रचल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास पाेलिस करत आहेत.