Accident News Chiplun: कुंभार्ली घाटात दोनशे फुट खोल दरीत कार कोसळली, एक जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 18:01 IST2022-06-14T17:36:14+5:302022-06-14T18:01:12+5:30
चालकाचा ताबा सुटल्याने कार सुमारे दोनशे फुट खोल दरीत कोसळली

Accident News Chiplun: कुंभार्ली घाटात दोनशे फुट खोल दरीत कार कोसळली, एक जण ठार
चिपळूण : चिपळूण - कराड मार्गावर कुंभार्ली घाटात कारचा भीषण अपघात झाला. कारवरील ताबा सुटल्याने कार सुमारे दोनशे फुट खोल दरीत कोसळली. यात चिपळूणातील सेवानिवृत्त उपअभियंता शंकर भिसे जागीच ठार झाले तर त्यांच्याबरोबर असलेली महिला प्रवासी गंभीर जखमी झाली आहे. आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.
सेवानिवृत्त उपअभियंता शंकर भिसे हे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या चिपळूण विभागात शाखा अभियंता म्हणून दिर्घकाळ कार्यरत होते. काही वर्षापूर्वी त्यांना बढती मिळाल्यानंतर त्यांची अमरावती येथे बदली झाली होती. तेथून कराड येथे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते. मे अखेर ते सेवानिवृत्त झाले. आज सकाळी ते चिपळूणकडे जात असताना कुंभार्ली घाटात त्यांच्या कारचा अपघात झाला. कारवरील ताबा सुटल्याने सुमारे दोनशे फुट खोल दरीत कार कोसळली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेली महिला अश्विनी दिग्विजय रासकर (वय. 32, रा. सातारा) गंभीर जखमी झाली.
अपघाताची माहिती मिळताच अलोरे शिरगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी व पोफळीतील ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी महिला व भिसे यांचा मृतदेह बाहेर काढला. जखमी महिलेला कामथे उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर भिसे यांचे शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. भिसे यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी पत्नी असा परिवार आहे.