Ratnagiri: बिबट्याच्या तोंडातून बछडा निसटला अन् आईपासून दुरावला, भेट घडविण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:11 IST2025-06-10T16:09:41+5:302025-06-10T16:11:29+5:30
तज्ज्ञ अधिकारी येणार

Ratnagiri: बिबट्याच्या तोंडातून बछडा निसटला अन् आईपासून दुरावला, भेट घडविण्याचा प्रयत्न
लांजा : रस्ता ओलांडताना मादी बिबट्याच्या तोंडातून १५ दिवसांचा बछडा सुटून रस्त्यावर पडल्याची घटना रविवारी (दि. ८) रात्री ७:३० ते ८ वाजण्याच्या दरम्यान घडली. त्यामुळे आई व बछड्यांची ताटातूट झाली. हा बिबट्या लांजा - काजरघाटी मार्गावरील पूनस संसारी फाटा येथे रस्त्यावर पडलेला हाेता. या बछड्याला वनविभागाने ताब्यात घेतले असून, ताे सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्या आईचा शाेध वनविभाग घेत आहे.
लांजा-काजरघाटी मार्गावरील पूनस संसारी फाट्याच्या उतारावर जंगलमय भागातून मादी बिबट्या आपल्या १५ ते २० दिवसांच्या बछड्याला तोंडातून घेऊन रात्री रस्ता ओलांडत हाेती. त्याचवेळी तिच्या तोंडातून बछडा रस्त्यावर पडला. त्याचवेळी गाड्यांची वाहतूक असल्याने या बछड्याला घेऊन जाता आले नाही. त्यामुळे ताे तिथेच रस्त्यावर पडलेला हाेता. रस्त्यावर बछडा असल्याचे कळताच त्याला पाहण्यासाठी गर्दी झाली हाेती. या घटनेची माहिती मिळताच वनपाल सारिका फकीर, वनरक्षक श्रावणी पवार, नमिता कांबळे, बाबासाहेब ढेकरे यांनी धाव घेतली.
वनविभागाच्या पथकाने घटनास्थळावरून ग्रामस्थांना बाजूला केले. तसेच त्या बछड्याला त्याचठिकाणी ठेवून बिबट्या येताे का याची वाट पाहण्यात आली. मात्र, पहाटेपर्यंत बिबट्या न आल्याने वनविभाग बछड्याला घेऊन लांजा येथे आले. साेमवारी (दि. ९) सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून हा बछडा सुस्थितीत असल्याचे सांगितले.
तज्ज्ञ अधिकारी येणार
या बछड्याला दूध, लिक्विड देण्यात येत आहे. तसेच या बछड्याच्या वैद्यकीय तपासणीसाठी सातारा किंवा सांगली येथील तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आईची भेट घडविण्याचा प्रयत्न
मादी बिबट्या रस्ता ओलांडत असताना कोणत्यातरी अज्ञात वाहनाची धडक बसल्याने हा बछडा तिच्या तोंडातून निसटला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी रात्री वनविभागाकडून या बछड्याला पुन्हा त्याच जागी ठेवून आई व बछड्याची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.