८६० कोटींचा आराखडा, रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीने केली निधीमध्ये घसघशीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 13:48 IST2025-02-03T13:47:39+5:302025-02-03T13:48:25+5:30
रत्नागिरी : अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक याेजना सन २०२५-२६ साठी ८६०.२१ काेटींच्या आलेल्या मागणीच्या आराखड्याला जिल्हा नियाेजन समितीच्या ...

८६० कोटींचा आराखडा, रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीने केली निधीमध्ये घसघशीत वाढ
रत्नागिरी : अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक याेजना सन २०२५-२६ साठी ८६०.२१ काेटींच्या आलेल्या मागणीच्या आराखड्याला जिल्हा नियाेजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. गतवेळच्या आराखड्यापेक्षा यावर्षी ५०० काेटींची घसघशीत वाढ करण्यात आली आहे. सन २०२४-२५ चा आराखडा ३६० काेटींचा हाेता.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी जिल्हा नियाेजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रसाद लाड, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले की, मागील वर्षी जिल्ह्याच्या तरतूदीमध्ये भरीव वाढ झालेली आहे. यावर्षीही ती होईल, असे सांगितले. ८६० कोटींचा आराखडा बनविण्यात आला असून, राज्य नियोजन समितीच्या बैठकीमध्ये त्याबाबत निश्चितपणाने मागणी केली जाईल, असेही ते म्हणाले.
खासदार राणे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत यश मिळवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्वांगीण विकासाला चालना देऊन सर्वकष अर्थसंकल्प सादर करुन देशाला जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आणल्याबद्दल पंतप्रधान, अर्थमंत्री आणि सहकारी मंत्र्याचे अभिनंदन करून शुभेच्छा देतो, असे सांगितले.
जिल्हाधिकारी सिंह यांनी संगणकीय सादरीकरण केले. सभेच्या सुरुवातीला दिवंगत माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुचित वंजारे यांनी आभार मानले.
अभिनंदनाचा ठराव
विधानसभा निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या शासनाचे, पालकमंत्री उदय सामंत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. आमदार शेखर निकम यांनी डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. या प्रस्तावाला खासदार नारायण राणे यांनी पाठिंबा दिला. ३१ मार्चपर्यंत १०० टक्के निधी खर्च केला जाईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.