Ratnagiri: वादळात भरकटलेल्या चार नौकांसह ३० मच्छीमार सुखरूप; गेले सहा दिवस होत नव्हता संपर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 13:27 IST2025-11-01T13:25:50+5:302025-11-01T13:27:47+5:30
मासेमारीसाठी खोल समुद्रामध्ये गेल्या होत्या

संग्रहित छाया
गुहागर (जि. रत्नागिरी) : अरबी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या चार नाैका वादळामुळे भरकटून समुद्रातच अडकल्या हाेत्या. गेले सहा दिवस या नाैकांशी काेणताच संपर्क हाेत नसल्याने सारे धास्तावले हाेते. मात्र, शुक्रवारी दुपारी या नाैकांशी संपर्क हाेऊन चार नाैकांसह त्यावरील ३० मच्छीमार सुखरूप असल्याचे कळताच साऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दाेन आणि उरणमधील दाेन नाैकांचा समावेश आहे.
रायगड जिल्ह्यातील उरण येथील करंजा मच्छीमार सोसायटीच्या ‘चंद्राई’ व ‘गावदेवी मरीन’ या २ नाैका, तसेच गुहागर तालुक्यातील वेलदूर मच्छीमार सहकारी संस्थेची ‘बाप्पा माेरया’ ही नाैका, दापोली तालुक्यातील कोळथरे सोसायटीची ‘साईचरण’ ही नाैका रविवारी (२६ ऑक्टाेबर) मासेमारीसाठी खोल समुद्रामध्ये गेल्या होत्या. मात्र, रविवारपासूनच चक्रीवादळाचा प्रभाव जाणवू लागताच मत्स्य विभागाने नाैकांना समुद्रातून माघारी येण्याची सूचना केली हाेती.
त्यानुसार मासेमारीसाठी गेलेल्या या चारही नाैकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वादळामुळे या नाैका समुद्रात भरकटल्या आणि त्यांच्याशी संपर्क तुटला. या नाैकांशी काेणताच संपर्क हाेत नसल्याने या घटनेची माहिती करंजा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेने इंडियन कोस्ट गार्ड, तसेच मत्स्य व्यवसाय विभागाला मंगळवार, दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी ई-मेलद्वारे कळविली होती. त्यानंतर यंत्रणेमार्फत नाैकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
गेले सहा दिवस या नाैकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी या नाैकांशी संपर्क झाला. त्यानंतर या चारही नाैका सुखरूप असून, एकत्रच असल्याची माहिती गुहागरातील वेलदूर मच्छीमार सहकारी साेसायटीचे प्रमुख बावा भालेकर यांनी दिली. या नाैका लवकरच किनाऱ्यावर येतील, असेही त्यांनी सांगितले.