कुणी जागा देता का?, रत्नागिरी जिल्ह्यातील १०१ आरोग्य उपकेंद्रांना स्वत:ची जागाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 18:42 IST2025-01-22T18:41:48+5:302025-01-22T18:42:09+5:30

रहिम दलाल रत्नागिरी : ग्रामीण भागात गरीब रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी उपकेंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, या उपकेंद्रांना ...

101 health sub-centres in Ratnagiri district do not have their own premises | कुणी जागा देता का?, रत्नागिरी जिल्ह्यातील १०१ आरोग्य उपकेंद्रांना स्वत:ची जागाच नाही

कुणी जागा देता का?, रत्नागिरी जिल्ह्यातील १०१ आरोग्य उपकेंद्रांना स्वत:ची जागाच नाही

रहिम दलाल

रत्नागिरी : ग्रामीण भागात गरीब रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी उपकेंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, या उपकेंद्रांना स्वत:ची हक्काची जागा नसल्याने भाड्याच्या जागेतून रुग्णसेवा करावी लागत आहे. जिल्ह्यातील १०१ उपकेंद्रे सध्या भाड्याच्या जागेत असून, या उपकेंद्रांसाठी जागेचा शोध सुरु आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रे ही गरजू व गरीब रुग्णांच्या आरोग्यासाठी जीवनदायी ठरत आहेत. या उपकेंद्रांमध्ये किरकोळ उपचार करण्यात येत असले तरी रुग्णांना गरजेच्या वेळी त्यांचा उपयाेग हाेताे. मात्र, अनेक वर्षांपासून हंगामी सेवा बजावणाऱ्या या उपकेंद्रांच्या इमारतीसाठी कोणीही दानशूर जमीन देण्यास पुढे येत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३७८ आरोग्य उपकेंद्रे मंजूर आहेत. २१८ उपकेंद्रांच्या हक्काच्या इमारती आहेत, तर १०१ इमारतींसाठी अजूनही जमीन मिळालेली नाही. या उपकेंद्रांच्या इमारत बांधण्यासाठी लागणारी जमीन खरेदी करण्यासाठी शासनाकडून कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे जमीन खरेदी करणार कशी, असा प्रश्न निरुत्तर राहिला आहे.

त्यासाठी जमीन विनामोबदला मिळाली आणि जागेचे बक्षीसपत्र केल्यानंतरच त्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र उभारता येणार आहे. जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या उपकेंद्रांना कोणीही जमीन देण्यास पुढे येत नाही. त्यामुळे अजूनही या उपकेंद्रांसाठी काेणी जागा देता का, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

किमान ५ गुंठे जागा

५ गुंठे जमीन उपकेंद्रांसाठी ग्रामीण भागात ग्रामपंचायतींकडून मिळणे आवश्यक आहे. ज्या जमिनी बक्षीसपत्राने देण्यात आल्या आहेत, दानशूर व ग्रामपंचायतींनी १७ उपकेंद्रांना जागा दिली दिली आहे. या उपकेंद्रांना इमारती बांधकामाची शासन स्तरावर प्रक्रिया सुरू आहे.

..तर स्थलांतर नक्की

शासनाच्या आदेशानुसार जमीन उपलब्ध होत नसल्यास ते उपकेंद्र जवळच्या गावात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात हलविण्यात यावे, अशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या होत्या.

  • एकूण उपकेंद्रे - ३७८
  • उद्घाटनाभवी ताब्यात नसलेली उपकेंद्रे - ६
  • बांधकाम सुरू असलेली उपकेंद्रे - ६
  • मुख्यालयाच्या ठिकाणी असलेली उपकेंद्रे - २३
  • जागा मिळालेली उपकेंद्रे - १७
  • स्थलांतर होणारी उपकेंद्रे - ७

Web Title: 101 health sub-centres in Ratnagiri district do not have their own premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.