वाद नेत्यांचा, फायदा भाजपचा; अशोक गेहलोत- सचिन पायलट यांच्यातील मतभेद भोवले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 06:21 AM2023-12-04T06:21:11+5:302023-12-04T06:21:31+5:30

काँग्रेसने आपल्या कार्यकाळात विविध योजनांची मोठ्या प्रमाणात घोषणा केली, मात्र त्याची योग्यरीत्या  अंमलबजावणी न झाल्याचा  फटका त्यांना बसला

Controversy of leaders, benefit of BJP; Difference between Ashok Gehlot and Sachin Pilot | वाद नेत्यांचा, फायदा भाजपचा; अशोक गेहलोत- सचिन पायलट यांच्यातील मतभेद भोवले

वाद नेत्यांचा, फायदा भाजपचा; अशोक गेहलोत- सचिन पायलट यांच्यातील मतभेद भोवले

जयपूर : प्रत्येक पाच वर्षांनंतर सत्तांतराची परंपरा यंदाही कायम राखत राजस्थानमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळविला. काँग्रेसच्या कल्याणकारी योजनांपुढे भाजपकडून पंतप्रधान मोदींचा करिष्मा वरचढ ठरला. नेत्यांमधील गटबाजी आणि भ्रष्टाचारामुळे काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. 

राजस्थानमध्ये प्रचारावेळी काँग्रेसने सर्वाधिक भर दिला होता, तो चिरंजीवी आरोग्य योजनेवर. परंतु, दुसरीकडे ग्रामीण भागात सरकारी रुग्णालयांची परिस्थिती मात्र चांगली नसल्याचे चित्र आहे. काँग्रेसने आपल्या कार्यकाळात विविध योजनांची मोठ्या प्रमाणात घोषणा केली, मात्र त्याची योग्यरीत्या  अंमलबजावणी न झाल्याचा  फटका त्यांना बसला. तसेच पेपर लीक प्रकरणामुळे युवावर्गाची नाराजी भाजपने हेरत प्रचारात त्यावर भर दिला. काँग्रेसने मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात मतभेद नसल्याचे वारंवार सांगितले जात असले तरी एकूण निवडणूक प्रक्रियेत काँग्रेस नेत्यांमधील गटबाजी वारंवार समोर दिसली.

प्रचाराचे योग्य नियोजन आणि बूथ पातळीपर्यंत समन्वयाचा फायदा भाजपला झाला. मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील प्रचार संपल्यानंतर अखेरच्या टप्प्यात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी राजस्थानमध्ये उतरले.  निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सातपैकी चार खासदार विजयी झाले तर तीन पराभूत झाले आहेत.

‘राजस्थान का योगी’ महंत बालकनाथ

‘राजस्थान का योगी’ म्हणून प्रसिद्ध असलेले खासदार महंत बालकनाथ राजस्थान मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत हेदेखील मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत. अलवर लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेले अवघे ४० वर्षे वय असलेले बालकनाथ यांनी तिजारा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. रविवारी मतमोजणी प्रारंभ होण्यापूर्वी बालकनाथ यांनी शिवमंदिरात दर्शन घेतले. शनिवारी त्यांनी भाजपचे प्रदेश संघटन महासचिव यांची भेट घेतली होती. ‘मुख्यमंत्रिपदाचा निर्णय पक्ष घेईल. पंतप्रधान मोदी हे भाजपचा चेहरा आहेत. त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू. मी खासदार म्हणून समाधानी आहे, ’ असे त्यांनी सांगितले.

सहाव्या वर्षी संन्यास
महंत बालकनाथ यांनी वयाच्या सहाव्या वर्षी संन्यास घेतला. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच बालकनाथ हेदेखील नाथ संप्रदायाचे प्रतिनिधित्व करतात. अलवरमध्ये ते लोकप्रिय आहेत.

Web Title: Controversy of leaders, benefit of BJP; Difference between Ashok Gehlot and Sachin Pilot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.