हेडफोन घालून रूळ ओलांडताना महिला ठार; वाचवायला गेलेल्या तरुणाचाही मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 12:00 IST2025-07-23T12:00:00+5:302025-07-23T12:00:15+5:30
अंबरनाथ : कानात हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला, तसेच तिला वाचवायला गेलेल्या तरुणानेही ...

हेडफोन घालून रूळ ओलांडताना महिला ठार; वाचवायला गेलेल्या तरुणाचाही मृत्यू
अंबरनाथ : कानात हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला, तसेच तिला वाचवायला गेलेल्या तरुणानेही त्यात जीव गमावला. अंबरनाथच्या मोरीवली गावाजवळ ही घटना रविवारी (दि. २०) रात्री साडेसातच्या सुमारास घडली.
वैशाली सुनील धोत्रे (४५) असे या महिलेचे नाव असून, त्या अंबरनाथच्या मोरीवली गावातील रहिवासी होत्या. तसेच मृत तरुण आतिष रमेश आंबेकर (२९) हा महालक्ष्मीनगरात राहत होता. हे दोघेही आनंदनगर एमआयडीसीत एकाच कंपनीत कामाला होते. रविवारी (दि. २०) सायंकाळी ७:३० वाजता ते कंपनीतून घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी आतिष हा वैशाली यांना सोडण्यासाठी बी केबिन रोडवरील मोरीवली गावाजवळ गेला.
आरडाओरडा केला तरी ऐकू आले नाही !
वैशाली या कानात हेडफोन घालून फोनवर बोलत रेल्वे रूळ ओलांडत होत्या. त्यावेळी वेगात रेल्वे येताना पाहून आतिष आंबेकर यांच्यासह अन्य लोकांनी वैशाली यांना हाका मारल्या. पण हेडफोनमुळे त्यांना काहीच ऐकू आले नाही. तेव्हा आतिष आंबेकर यांनी स्वत: त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. वेगाने येणाऱ्या रेल्वेने दोघांनाही धडक दिली.
आतिष याच्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्न झालेली असून, तो त्याच्या वृद्ध आईवडिलांचा एकमेव आधार होता. वैशाली यांना एक मुलगी आणि २२ वर्षांचा मुलगा असून, त्यांचे पती रिक्षाचालक आहेत. यंदा मुलीचे लग्न करण्याची तयारी करत होते.