पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 06:00 IST2025-10-09T05:59:10+5:302025-10-09T06:00:46+5:30
मविआचे काम कोणत्याही पापापेक्षा कमी नसल्याची टीका : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा, मुंबई मेट्रो लाइन-३ आणि ‘मुंबई वन’ या देशातील पहिल्या एकात्मिक कॉमन मोबिलिटी ॲपचे उद्घाटन

पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
- नारायण जाधव/वैभव गायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कर पाकिस्तानवर हल्ल्याच्या तयारीत हाेते. देशाची हीच मागणी होती. मात्र, दुसऱ्या देशाच्या दबावानंतर भारतीय लष्करास हल्ला करण्यापासून रोखले, असे वक्तव्य गृहमंत्री राहिलेल्या काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने केले आहे. यामुळे कोणत्या देशाच्या दबावाखाली व नेत्याच्या आईच्या सांगण्यावरून पाकवर भारताने हल्ला केला नाही, हे काँग्रेसने देशाला सांगावे, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिले.
आमच्यासाठी देश आणि जनतेची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही घरात घुसून शत्रूला मारल्याचे संपूर्ण जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखवून दिले, असेही मोदी म्हणाले. महाविकास आघाडीमुळे मुंबई मेट्रोचे काम थांबले होते. परिणामी देशाचे हजारो कोटींचे नुकसान झाले, हे पापापेक्षा कमी नाही, अशा शब्दांत पंतप्रधानांनी तत्कालीन मविआ सरकारचा समाचार घेतला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या लाेकार्पणासह मुंबई मेट्रो लाइन-३ च्या अंतिम टप्प्याचे तसेच ‘मुंबई वन’ या देशातील पहिल्या कॉमन मोबिलिटी ॲपचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. राज्यातील ४१९ आयटीआय आणि १४१ तंत्र संस्थांमध्ये २,५०६ बॅचेसच्या माध्यमातून अल्प मुदतीचे नवीन रोजगारक्षम अभ्यासक्रम या उपक्रमाची सुरुवातही यावेळी करण्यात आली.
मेट्रो-३ विकसित भारताचे प्रतीक
मुंबईची भूमिगत मेट्रो विकसित होणाऱ्या भारताचे प्रतीक असल्याचे सांगून पंतप्रधानांनी या प्रकल्पांसाठी काम केलेल्या कामगार, अभियंत्यांचे कौतुक केले. मेट्रो ३ चे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले होते. मात्र, मधल्या काळात मविआचे लोक सत्तेत आले. त्यांच्यामुळे प्रकल्प रखडला. यातून देशाचे हजारो कोटींचे नुकसान झाले. हे एक प्रकारचे पाप असल्याची टीका त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून केली.
स्वदेशी स्वीकारा, देशाची क्षमता वाढवा
तुम्हाला स्वदेशी स्वीकारण्याचा आग्रह करतो. अभिमानाने जाहीर करा, ‘ही स्वदेशी आहे.’ स्वदेशी हा प्रत्येक घराचा आणि प्रत्येक बाजारपेठेचा मंत्र असला पाहिजे. प्रत्येक नागरिक स्वदेशी वस्तू घरी आणेल आणि स्वदेशी वस्तू भेट देईल. यामुळे भारताचा पैसा देशात राहील. त्यातून भारतीय कामगारांना काम मिळेल आणि तरुणांना रोजगार मिळेल. जेव्हा संपूर्ण भारत स्वदेशी स्वीकारेल, तेव्हा भारताची क्षमता किती वाढेल याची कल्पना करा.
नवभारताचे व अभियंत्यांच्या काैशल्याचे उदाहरण
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नवभारताचे प्रतीक आहे. भारतीय अभियंत्यांच्या कौशल्याचे अद्भुत उदाहरण म्हणजे हे विमानतळ आहे. महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणारे हे विमानतळ असून, त्यामुळे राज्याचा जीडीपीदेखील एक टक्क्याने वाढणार आहे. या विमानतळामुळे नवी मुंबई जगाच्या नकाशावर आली आहे.
- देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री
माेदी म्हणाले...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीत केली. लोकनेते दि. बा. पाटील यांनी समाज आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्यातून प्रेरणा मिळते, असे मोदी म्हणाले. जिथे गती आणि प्रगती दोन्ही आहे, तिथे देशाचा विकास हाेताे, असे पंतप्रधान म्हणाले. नवी मुंबई विमानतळ शिवाजी महाराजांच्या भूमीत असून, त्याचा आकार कमळासारखा आहे. या विमानतळाचा लाभ महाराष्ट्रातील शेतकरी आणि मच्छीमारांना होणार आहे. युरोप, मध्य पूर्वेला येथील शेतकरी जोडले जातील. महाराष्ट्रातील मासळी, फळे, भाज्यांना जागतिक बाजारपेठ मिळेल असे पंतप्रधान म्हणाले. देशात असेही लोक आहेत, जे फक्त सत्तेला महत्त्व देतात. असे लोक अडथळे आणून भ्रष्टाचार करत विकास प्रकल्प स्थगित ठेवतात.
विमानतळांच्या वाढत्या संख्येमुळे विमान उत्पादकांकडे भारतीय कंपन्यांची एक हजार विमानांची ऑर्डर बुक झाली आहे. पायलट, क्रू मेंबर, तंत्रज्ञांना रोजगार मिळून भारत एमआरओ हब बनवणे हे आमचे लक्ष्य आहे.