आलिशान वाहनातून यायचे; घर साफ करून पोबारा करायचे, आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 14:03 IST2025-11-01T14:03:28+5:302025-11-01T14:03:28+5:30
आरोपींकडून दागिने हस्तगत

आलिशान वाहनातून यायचे; घर साफ करून पोबारा करायचे, आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
अलिबाग : रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यात घरफोडी, चोरी करणाऱ्या अट्टल आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे पथकाने जेरबंद केले आहे. टोळीतील तीन आरोपींना अटक झाली असून, दोघे फरार आहेत. पकडलेले आरोपी हे कुठल्याच गुन्ह्यात रिकव्हरी देत नसल्याचा इतिहास असूनही रायगड पोलिसांनी आरोपींकडून १५ लाख ५० हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अनोळखी आरोपी हे आलिशान चारचाकीमधून येऊन उच्चभू सोसायटीतील बंद असेले घर लक्ष्य करत होते. घरफोडी करून गाड्यांची नंबरप्लेट बदलायचे व परजिल्ह्यात पसार व्हायचे. ३ ऑगस्टला संशयित आरोपी माणगाव येथे आल्याची माहिती स्थानिक गुन्हे विभागाला मिळाली होती. मात्र, आरोपी हे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार हबीर यांनी आरोपी उत्तर प्रदेशातल्या सिकंदराबाद येथे असल्याची माहिती काढली. स्थानिक गुन्हे पथकाने सिकंदराबाद येथे जाऊन त्यांना पकडले.
यांनी यशस्वी कारवाई करून चोरट्यांना पकडले
जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलिस अधिक्षक अभिजित शिवथरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भास्कर जाधव, सपोनि मानसिंग पाटील, पोसई लिंगप्पा सरगर, पोह अमोल हंबीर, प्रतीक सावंत, श्यामराव कराडे, स्वींद्र मुंढे, अक्षय पाटील, सचिन वावेकर, अक्षय जाधव, रेखा म्हात्रे, सुदीप पहेलकर, अक्षय जगताप, मोरेश्वर ओमले, वाघमोडे, बाबासो. पिंगळे, ओंकार सोंडकर, प्रशांत लोहार यांनी कारवाई केली.
मुख्य आरोपीवर सिकंदराबादमध्ये २३ गुन्हे
आरोपी हे सराईत असून, त्यांच्यावर दोन खूनासह चार खुनांचा प्रयत्न केल्याचे आणि आर्म्स अॅक्टचे गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे पथकाने ५ अधिकारी ४० पोलिस अंमलदार यांच्या पथकासह घरी छापा टाकून शहानवाज इकराम कुरेशी (५०) याला ताब्यात घेतले. त्याने रोहा, पाली, महाड, 3 श्रीवर्धन, मंडणगड, शहर आणि वाईत घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्यावर सिकंदराबादमध्ये २३ गुन्हे दाखल आहेत.