अवकाळीमुळे उरणचे शेतकरी चिंताग्रस्त; आंबा, वाल, चवळीसह भाजीपाला धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 10:30 IST2024-12-29T10:29:32+5:302024-12-29T10:30:45+5:30
अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिके धोक्यात आली आहेत. तसेच आंबा मोहोर आणि शेवग्याची फुलेही गळून पडू लागली आहेत. आणखी पाऊस पडला तर पिकांमध्ये कीड पडण्याची शक्यता आहे.

अवकाळीमुळे उरणचे शेतकरी चिंताग्रस्त; आंबा, वाल, चवळीसह भाजीपाला धोक्यात
उरण : उरण परिसरातील मागील काही दिवसांपासून बदलेले हवामान आणि शनिवारी अवकाळी पाऊस कोसळला. यामुळे आंबा मोहोर, फळांसह इतर पिके धोक्यात येण्याच्या भीतीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
उरण परिसरात मागील काही दिवसांपासून कधी दमट, कधी वाढती थंडी, तर कधी ढगाळ वातावरण, काळे मेघ दाटून येणे अशाप्रकारे सातत्याने हवामानात बदल होताना दिसत आहे. त्यातच शनिवारी पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सातत्याने बदलत्या या बेमोसमी हवामानाचा परिणाम आंबा मोहोर, शेवगा, रब्बी पिकांतील वाल, तूर, उडीद, मूग, चवळी, टोमॅटो, वांगी, भेंडी, कोथिंबीर, पालक, मुळा, मेथी, कारली यासारख्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम जाणवू लागला आहे. यामुळे भाजीपाल्यासह इतर पिके धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिके धोक्यात आली आहेत. तसेच आंबा मोहोर आणि शेवग्याची फुलेही गळून पडू लागली आहेत. आणखी पाऊस पडला तर पिकांमध्ये कीड पडण्याची शक्यता आहे.
- सुरेश पाटील, शेतकरी
आणखी अवकाळी पाऊस पडला तर आंबा मोहोर, शेवग्याची फुले गळून जाण्याची शक्यता आहे. अल्पावधीतील भाजीपाला पिकांना फारसा धोका नाही. मात्र, त्यानंतरही पाहणी करून नुकसान अहवाल सादर करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
- अर्चना सुळ,
तालुका कृषी अधिकारी