Take advantage of CM Self-Employment Generation Scheme; Appeal of Guardian Minister Aditi Tatkare | मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या; पालकमंत्री आदिती तटकरेंचं आवाहन 

मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या; पालकमंत्री आदिती तटकरेंचं आवाहन 

पेण : फिरत्या विक्री केंद्राद्वारे वस्तू, फळे, भाजीपाला, वडापाव, भजी, आइसक्रीम, बिर्याणी, नाश्ता, लंच, डीनर, इडली-वडा आदी व्यवसाय सुरू करण्यासाठी वस्तुंची आयात-निर्यात यासाठी लागणारे वाहन, टेम्पो मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती योजनेतून मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

पेण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडल्यानंतर शासकीय कार्यक्रमात स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. संपूर्ण योजनेची माहिती व भविष्यात मिळणारा रोजगार याबाबतची माहिती दिली. त्यानंतर, पहिल्याच दिवशी या योजनेच्या पेण येथील रामसीता निवासी इमारतीतील कार्यालयात तब्बल २० ते २५ बेरोजगारांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती कार्यालयीन सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.

स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून कुटीर उद्योग, लघू उद्योग, फिरते विक्री केंद्र या ग्राउंड रूटवरील व्यवसायाला चालना देऊन पर्यटनस्थळी या व्यवसायाचा पसारा वाढविणे हे शासनाचे उदिष्ट आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या छोट्या व्यवसायला उर्जित अवस्था देणारी करून, कृषी उत्पादन विक्री, भाजीपाला, फळे याबरोबरच अनेक वस्तू व पदार्थाची विक्रीसेवा, प्रत्येक शहरात व आठवडा बाजार या ठिकाणी व्यवसायाला चालना देण्यासाठी ही योजना मैलाचा दगड ठरेल, अशी आशा आहे.

१० नोव्हेंबरपर्यंत अर्जासाठी मुदत

  • महिला बचतगटासाठी आपली तयार उत्पादने विक्रीसाठी या फिरते विक्री केंद्र व मिळणारे टेम्पो वाहन व्यवसायला पूरक अशी ही योजना वरदान ठरणारी आहे. ग्रामीण भागातील एससी, एसटी ओबीसी महिला करीता ३५ टक्के सबसिडी, तर पुरुषासाठी २५ टक्के सबसिडीचा लाभ मिळणार आहे. टेम्पोची खरेदीची एकूण रक्कम ६ लाख ८४८ रुपये आहे.
  • या योजनेच्या नोंदणीसाठी आजपासून महिनाभर म्हणजे १० नोव्हेंबरपर्यंत पेण येथे स्वयंरोजगार निर्मिती कार्यालय सुरू राहणार आहे. अर्जदारांनी अधिक माहितीसाठी या कार्यालयात जाऊन तपशीलवार माहिती घ्यावी. एकंदर शासनाच्या या योजनेच्या माध्यमातून स्थानिक १८ ते ४५ वयोगटांतील सर्वांकडून शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले आहे.

Web Title: Take advantage of CM Self-Employment Generation Scheme; Appeal of Guardian Minister Aditi Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.