सुभाष पुजारी ठरले मास्टर भारत श्री २०२१; हा पुरस्कार जिंकणारे देशातील पहिलेच पोलीस अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 23:27 IST2021-03-24T23:27:07+5:302021-03-24T23:27:29+5:30
कोल्हापूर येथे नैसर्गिक आपत्तीमुळे पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे कोल्हापूरवासीयांचे जनजीवन विस्कळीत झाले होते अशावेळी त्यांनी कोल्हापूर येथील ६०० कुटुंबीयांना किमान ८ दिवस पुरेल इतका रेशन पुरवठा केला होता

सुभाष पुजारी ठरले मास्टर भारत श्री २०२१; हा पुरस्कार जिंकणारे देशातील पहिलेच पोलीस अधिकारी
वैभव गायकर
पनवेल : इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशन यांचेवतीने २० व २१ मार्चदरम्यान लुधियाना पंजाब येथे आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या मेन्स ज्युनिअर, मास्टर, दिव्यांग, वुमेन ज्युनिअर, ज्युनिअर नॅशनल बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी ‘भारत श्री २०२१’ स्पर्धेचे मानकरी ठरले आहेत. हा किताब फडकविणार पुजारी हे देशातील पहिलेच पोलीस अधिकारी आहेत.
‘मास्टर भारत श्री’ २०२१ खेळताना ८० किलो वजनीगटात सुभाष पुजारी यांनी गोल्ड मेडल पटकावले आहे. ही बाब महाराष्ट्र पोलीस खात्याची मान वाढविणारी आहे. १ ते ७ सप्टेंबरदरम्यान मालदीव येथे होणाऱ्या आंतराष्ट्रीय स्पर्धेसाठी पुजारी भारतचे नेतृत्व करणार आहेत. राष्ट्रीय मास्टर एशिया श्री २०२१ या बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये त्यांची निवड भरतीय संघातून झाली आहे. सुभाष पुजारी हे सहा. पोलीस निरीक्षक म्हणून महामार्ग पोलीस मदत केंद्र पळस्पे येथे प्रभारी अधिकारी म्हणून कर्तव्यावर आहेत. त्यांनी महामार्ग पोलीस विभागात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वरिष्ठांच्या आदेशाने वेळोवेळी वेगवेगळी उपक्रम राबवून महामार्गावरील वाहतुकीस शिस्त लावण्याचे काम केले आहे.
कोल्हापूर येथे नैसर्गिक आपत्तीमुळे पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे कोल्हापूरवासीयांचे जनजीवन विस्कळीत झाले होते अशावेळी त्यांनी कोल्हापूर येथील ६०० कुटुंबीयांना किमान ८ दिवस पुरेल इतका रेशन पुरवठा केला होता. त्याचबरोबर कोरोनाकाळात महामार्ग पोलीस व त्यांचे कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रयत्न केले.