'महाराष्ट्राशी संबंध नाही, आरोप खोटा'; राहुल गांधींनी दाखवलेला नंबर निघाला उत्तर प्रदेशातल्या अंजनीचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 14:27 IST2025-09-19T14:00:24+5:302025-09-19T14:27:01+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवण्यात आलेल्या फोन क्रमांक असलेली व्यक्ती समोर आली आहे.

'महाराष्ट्राशी संबंध नाही, आरोप खोटा'; राहुल गांधींनी दाखवलेला नंबर निघाला उत्तर प्रदेशातल्या अंजनीचा
Rahul Gandhi Press Conference: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मत चोरीच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा पत्रकार परिषदेत घेत स्फोटक आरोप केले आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी मत चोरीचा आरोप करत धक्कादायक दावे केले. पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत कर्नाटक आणि महाराष्ट्रात कोणीतरी जाणूनबुजून मतदार याद्यांमध्ये फेरफार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र या आरोपांमुळे उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींविरोधात आपण तक्रार दाखल करणार असल्याचे या व्यक्तीने म्हटलं.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या मत चोरीच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाला धारेवर धरलं आहे. गुरुवारी राहुल गांधी यांनी दिल्लीतील काँग्रेसच्या इंदिरा भवन मुख्यालयात पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग अनेक राज्यांमधील मतदारांना लक्ष्य करत असल्याचा आरोप केला. राहुल गांधींनी स्क्रीनवर काही नंबर दाखवून म्हटले की यांची मते रद्द करुन निवडणूक भारतीय लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्यांना संरक्षण देत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. मात्र राहुल गांधींनी स्क्रीनवर जो एक नंबर दाखवला तो प्रयागराजमधील एका व्यक्तीचा आहे. आता त्या नंबरवर सतत येणाऱ्या कॉलमुळे ती व्यक्ती अडचणीत आली असून त्याने पोलिसांची मदत घेण्याचे ठरवलं आहे.
राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर प्रयागराज जिल्ह्यातील मेजा येथील रहिवासी अंजनी मिश्रा यांच्या फोनवर सातत्याने कॉल्स येत आहेत.मी मेजा येथे राहतो. मला अचानक खूप फोन येऊ लागले. एका कॉलरने मला सांगितले की माझा नंबर व्हायरल झाला आहे, जो बनावट मतदार यादीच्या प्रकरणात आला आहे. मग त्याने एक स्क्रीनशॉट शेअर केला. मी पाहिले तेव्हा तो माझा नंबर होता. राहुल गांधींनी माझा नंबर चुकीच्या पद्धतीने दाखवला आणि आता मला अडचणींचा सामना करावा लागतोय. माझ्याकडे हा नंबर १५ वर्षांपासून आहे, असं अंजनी मिश्राने सांगितले.
"राहुल गांधींनी आरोप केला की महाराष्ट्रात मते चोरीला गेली आणि माझे मतदार ओळखपत्र हटवण्यात आले, जे खरे नाही. मी एक-दोन दिवसांसाठी महाराष्ट्रात गेलो असेल, पण मी महाराष्ट्रात वारंवार येत नाही. त्यामुळे माझे मतदार ओळखपत्र महाराष्ट्रात तयार किंवा हटवता येत नाही. हा पूर्णपणे खोटा आरोप आहे," असेही मिश्रा म्हणाले.
#WATCH | Prayagraj, UP | Person whose mobile number was shown at Lok Sabha LoP Rahul Gandhi’s PC yesterday, Anjani Mishra, says, "Rahul Gandhi made my phone number public in his press conference, which has caused me a lot of trouble. He implied that votes were stolen in… pic.twitter.com/sh7HAZuYB2
— ANI (@ANI) September 19, 2025
दरम्यान, कर्नाटकातील अलांड विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतून ६,०१८ मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. महाराष्ट्रातील राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत अशाच प्रकारे ६,८५० मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार मतदार यादीत घोळ करणाऱ्यांना संरक्षण देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. कर्नाटक सीआयडी या प्रकरणाची चौकशी करत आहे, पण निवडणूक आयोग आवश्यक माहिती देत नाही, ज्यामुळे तपास पूर्ण होत नाही, असंही राहुल गांधी म्हणाले.