शिंदे गटाच्या आमदाराची एसयूव्ही चुकीच्या लेनमध्ये घुसली; धडकेत तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 01:49 PM2024-03-05T13:49:07+5:302024-03-05T13:50:42+5:30

मोटारसायकलस्वाराच्या मृत्यूप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल; अद्याप अटक नाही

Shinde faction MLA's SUV enters wrong lane; Youth dies in collision | शिंदे गटाच्या आमदाराची एसयूव्ही चुकीच्या लेनमध्ये घुसली; धडकेत तरुणाचा मृत्यू

शिंदे गटाच्या आमदाराची एसयूव्ही चुकीच्या लेनमध्ये घुसली; धडकेत तरुणाचा मृत्यू

अलिबाग : शिवसेनेच्या शिंदे गटाचे अलिबाग - मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आ. महेंद्र दळवी यांच्या एसयूव्हीने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत शनिवारी एका तरुणाचा मृत्यू झाला. आ. दळवी यांची गाडी उसडी टोलनोक्यावर लेनमध्ये चुकीच्या दिशेने आली. त्यात झालेल्या धडकेत मोटारसायकलस्वार जासिम अब्दुल रहेमान पासवारे (३१, रा. उतेखोल, माणगाव) गंभीर दुखापतीत मृत झाल्याचे पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यात म्हटले आहे. आ. दळवी यांच्या गाडी चालकाला अटक झालेली नाही.

शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास आगरदांडा - इंदापूर रस्त्यावर उसडी नाक्यावर हा अपघात झाला.  या मोटारसायकलस्वाराचा या अपघातातमृत्यू झाला. आ. दळवी यांच्या गाडीचा चालक धनेश सानकर याच्यावर मुरुड पोलिस ठाण्यात अतिवेगाने व चुकीच्या पद्धतीने वाहन चालविणे, निष्काळजीपणा करत तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आ. दळवी हे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास नांदगाव येथे निघाले होते. त्यांची लॅण्ड क्रूझर गाडी धनेश सानकर चालवित होता. यावेळी वाहनात आ. दळवी, त्याचा अंगरक्षक,   कार्यकर्ते होते. जासिम हा मुरुडहून इंदापूरकडे जात होता.

दळवी यांच्या गाडीचा चालक धनेश याने उसडी नाक्यावर गाडी चुकीच्या लेनवर घेतली. गाडी अचानक चुकीच्या दिशेने समोर आल्याने मोटारसायकलस्वार गोंधळला आणि दोन्ही वाहने धडकली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, एसयूव्हीतील एअर बॅग उघडल्या. अपघातात आ. दळवी यांना किरकोळ दुखापत झाली. जखमी जासिम अब्दुल रहेमान पासवारे यास मुरुड शासकीय रुग्णालयात दाखल केले, तेव्हा डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक अविनाश राठोड करीत आहेत.

वन-वेमुळे याच ठिकाणी तिसरा अपघात   
इंदापूर - आगरदांडा या मार्गावर उसडी नाक्यावर एकच मार्ग सुरू आहे. इंदापूरकडे जाणाऱ्या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे बाह्य वळण करताना अपघाताच्या घटना घडतात. या आधीही या ठिकाणी दोन अपघात झाले आहेत. आमदार दळवींच्या वाहनाच्या अपघातानंतर शिवसैनिकांनी टोलनाक्यावरील बॅरिकेट्स काढले.

आमदारांची गाडी आणि मोटारसायकलच्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. याबाबत मुरुड पोलिस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालवून तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबत गाडीच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकास अटक करण्यात आलेली नाही. त्याला नोटीस बजावली आहे. अपघाताबाबत चौकशी सुरू असून, नक्की चूक कोणाची, याबाबत तपास केला जाणार आहे.
- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक, रायगड

Web Title: Shinde faction MLA's SUV enters wrong lane; Youth dies in collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.