रडण्याच्या आवाजाने सापडली; वडिलांना बिलगताच हसली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 11:16 IST2025-11-15T11:09:57+5:302025-11-15T11:16:23+5:30
Raigad News: आईसोबत गावाबाहेरच्या शौचालयात गेली असता बुधवारी काही मिनिटांतच अचानकपणे बेपत्ता झालेली पेण तालुक्यातील हेटवणे वाडीतील चार वर्षाची चिमुकली किशोरी किरण महालकर अखेर ४८ तासांनी डोंगरावरील झाडाखाली सापडली.

रडण्याच्या आवाजाने सापडली; वडिलांना बिलगताच हसली
पेण - आईसोबत गावाबाहेरच्या शौचालयात गेली असता बुधवारी काही मिनिटांतच अचानकपणे बेपत्ता झालेली पेण तालुक्यातील हेटवणे वाडीतील चार वर्षाची चिमुकली किशोरी किरण महालकर अखेर ४८ तासांनी डोंगरावरील झाडाखाली सापडली.
२०० जणांचा जमाव आणि पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमुळे भीतीपोटी अपहरणकर्त्याने मुलीला झाडाखाली बसवून ठेवून पळ काढला. शोधमोहिमेत सकाळी परिसरात मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून सीआर जवान त्या दिशेने गेला असता मुलगी घाबरलेल्या अवस्थेत सापडली आणि सर्वानी सुटकेचा निःश्वास सोडला. तिला वडिलांकडे सोपवताच ती त्यांना घट्ट बिलगली आणि चेहऱ्यावर हसू फुलले.
कुटुंबीयांनी मानले पोलिस यंत्रणेसह ग्रामस्थांचे आभार
मुलीला आदिवासी वाडीत नेऊन तिच्या पालकांसह वैद्यकीय तपासणीसाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. शासकीय रुग्णालयात तिची वैद्यकीय तपासणी करून अखेर तिची रवानगी दुपारी घराकडे करण्यात आली.
कुटुंबीयांनी धाडसी पोलिस यंत्रणा विशेषतः जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या संपूर्ण यंत्रणा आणि सामाजिक सेवाभावी संस्था मावळा प्रतिष्ठान, हेटवणे पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, तरुणांच्या एकजुटीचे आभार मानले.
मुलीची प्रकृती ठीक असून, उपचारानंतर ती पालकांसोबत घरी सुखरूप आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप बागुल तपास करीत आहेत.