तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 06:47 IST2025-07-10T06:46:38+5:302025-07-10T06:47:06+5:30
रायगड पोलिस प्रशासनाने अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करून तत्काळ हजर होण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत

तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
निखिल म्हात्रे
अलिबाग : रायगड जिल्ह्याच्या समुद्र किनारी भागांत संशयास्पद बोट असल्याचा संदेश तटरक्षक दलाकडून रविवारी रात्री मिळाल्यानंतर रायगड पोलिसांनी कसून शोध घेतला. त्यानंतर ती वस्तू जीपीएस ट्रॅकर असलेला ‘बोया’ होता, हे स्पष्ट झाले असले तरी या पोलिसांनी जिल्ह्याची सागरी सुरक्षा सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार किनाऱ्यांवरील ३ हजारांहून अधिक काॅटेज व हाॅटेलची तपासणी करण्यात आली आहे. हे ‘सर्च ऑपरेशन’ सुरू राहणार असल्याचे संकेतही दिले.
रायगड पोलिस प्रशासनाने अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करून तत्काळ हजर होण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत. अलिबाग, मुरूड तालुक्यातील समुद्रकिनारा आणि अन्य भागांत शस्त्रधारी नाकाबंदी आहे. तर, काही ठिकाणी ‘स्पेशल ऑल आऊट ऑपरेशन’ राबविण्यात आले आहे.
सायबर सेलची राहणार नजर
सोशल मीडियावर अफवा पसरवण्याचा प्रकार काही मंडळाकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांचे सोशल मीडिया सेल सक्रिय आहे. ही यंत्रणा २४ तास सुरु असणार आहे. विशेष म्हणजे मच्छीमारांसोबत संवाद साधून त्यांना सर्तक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सागर सुरक्षा दल, ग्रामसुरक्षा दल आणि पोलिस पाटीलांच्या बैठका घेऊन जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. समुद्रकिनाऱ्यांवर पोलिसांची सततची गस्त सुरू आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या सर्व गाड्या तापासण्यात जात आहेत. मुंबईहून मांडवा येथे बोटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तपासणी होत आहे. महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची २४ तास गस्तीचे काम सुरू आहे. - आँचल दलाल, जिल्हा पोलिस अधीक्षक