रायगड जिल्ह्यासाठी २३४ कोटींचा आराखडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 02:33 AM2020-01-25T02:33:11+5:302020-01-25T02:33:51+5:30

राज्यस्तरीय कोकण विभाग जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२०-२१ च्या बैठकीत रायगड जिल्ह्यासाठी ४५ कोटी रुपयांची भरीव वाढ करून एकूण २३४ कोटी रुपयांच्या प्रारूप विकास आरखड्याला मान्यता देण्यात आली आहे

Rs. 234 crore plan for Raigad district | रायगड जिल्ह्यासाठी २३४ कोटींचा आराखडा

रायगड जिल्ह्यासाठी २३४ कोटींचा आराखडा

Next

अलिबाग - राज्यस्तरीय कोकण विभाग जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२०-२१ च्या बैठकीत रायगड जिल्ह्यासाठी ४५ कोटी रुपयांची भरीव वाढ करून एकूण २३४ कोटी रुपयांच्या प्रारूप विकास आरखड्याला मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

मंत्रालयात उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत रायगड जिल्ह्याच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. काहीच दिवसांपूर्वी रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक अलिबाग येथे पार पडली होती, त्या वेळी २४७ कोटी रुपयांच्या प्रारूप विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. १८९ कोटी रुपयांच्या आराखड्यात ४५ कोटी रुपयांची वाढीव मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

रायगड जिल्ह्यातील पायाभूत सुविधांची निर्मिती, व्हिजन २०२२ प्रमाणे आराखडा मांडणी, जिल्ह्यातील सर्व गावे/वाड्यांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी आराखडा तयार करणे, मत्स्यविकास योजना, ५९ पर्यटन क्षेत्रात सोयी-सुविधा पुरवणे, सुशिक्षित बेरोजगारांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे, चार नव्याने पशुवैद्यकीय दवाखाने बांधकाम करणे, उर्वरित ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे, जिल्ह्यातील सर्व गावे, वाडीमध्ये स्मशानभूमी शेड बांधणे, गाव वाडी-वस्तीवर विद्युतीकरण करणे, जिल्ह्यात अ‍ॅम्ब्युलन्स स्पीड बोट सुरू करणे, आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी सायकल वितरण, ज्या अंगणवाड्या खासगी जागेत आहेत, त्यांना शासकीय जागा उपलब्ध करून देऊन जिल्ह्याच्या विकासासाठी गती देण्यात येईल, असेही तटकरे यांनी सांगितले.

व्हिजन २०२२ विकास आराखडा
स्वच्छ भारत निर्माण अभियान, जिल्ह्याचे रस्ते जोडणे, पाणी पुरवठा योजना/जलजीवन योजना, रायगड किल्ला जतन व संवर्धन, एलिफंटा लेणी संक्षिप्त विकास आराखडा, खारलॅण्ड विकास, कातकरी विकास आराखडा, कृषी क्षेत्र-रब्बी क्षेत्र व फलोत्पादन, सेंद्रिय शेती वाढविणे, बाजारपेठ उपलब्धता, प्रत्येकास पक्की घरे, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, गळतीचे प्रमाण कमी करणे, प्रगत शिक्षण विकास अभियान, कांदळवन विकास कार्यक्रम, कौशल्य विकास कार्यक्रम, प्लास्टिकमुक्त रायगड जिल्हा, जिल्ह्यातील ८४ गावांचे भूस्खलन थांबविणे, मत्स्यव्यवसाय विकास कार्यक्रम, पंतप्रधान विमा योजना, जीवन ज्योत योजना, गाव तेथे दूरसंचार सुविधा, ग्रामीण विद्युतीकरण या महत्त्वाच्या विकासकामांचा समावेश व्हिजन २०२२ मध्ये करण्यात आला आहे, असेही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Rs. 234 crore plan for Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.