शिवरायांच्या जयघोषाने रायगड दुमदुमला, ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 19:28 IST2025-06-07T19:27:36+5:302025-06-07T19:28:11+5:30
हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्तांनी गडावर हजेरी लावली होती.

शिवरायांच्या जयघोषाने रायगड दुमदुमला, ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात
आलिबाग/कोल्हापूर: लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर शुक्रवारी ३५१ वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. पावसाळ्यातील आल्हाददायी वातावरणात ढोल, ताशे, नगारे आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले शिवभक्त यामुळे रायगडावर शिवकाळ जागा झाला. हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्तांनी गडावर हजेरी लावली होती.
किल्ले रायगडावर गेले दोन दिवस पारंपरिक मर्दानी खेळ, पोवाडे, जागरण, गोंधळ, आणि ढोलताशे नगाऱ्यांनी वेगळेच वातावरण निर्माण केले होते. श्रीशिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने गेली अनेक वर्षे रायगडावर या सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. यावर्षीदेखील समितीने अत्यंत नियोजनबद्ध असे दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले. गडावर या निमित्ताने लाखो शिवभक्त दोन दिवस आधीच दाखल झाले होते. यामुळे संपूर्ण रायगड छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
राज सदरेवर या सोहळ्याला सुरुवात झाल्यानंतर समोर बसलेल्या लाखो शिवभक्तांनी एकच जल्लोष केला. शिवराज्याभिषेक गीताने या सोहळ्याची सुरुवात झाली. विधिवत पूजा केल्यानंतर महाराष्ट्रातील विविध नद्यांच्या आणलेल्या जलाने अभिषेक करण्यात आला. यावेळी युवराज संभाजीराजे छत्रपती आणि त्यांचे पुत्र शहाजीराजे छत्रपती, संयोगिता राजे, आमदार संजय गायकवाड, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवरायांच्या पालखीचे आगमन राजसदरेवर झाले. राज सदरेवरील उत्सव मूर्तीस अभिषेक करण्यात आला. येथील छत्रपती शिवरायांच्या सिंहासनारूढ मूर्तीस सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात आला. या सोहळ्याचे नियोजन फत्तेसिंह सावंत, सुखदेव गिरी, संदीप खांडेकर, अमर पाटील, विनायक फाळके, संजय पवार आदींनी केले.
दोन शिवभक्तांची तब्येत बिघडली
राज्यातून अनेक शिवभक्त शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर उपस्थित होते. यापैकी दोन शिवभक्तांची तब्येत बिघडली. एका शिवभक्ताला चक्कर आली तर दुसऱ्याला उन्हाचा त्रास जाणवला. दोन्ही शिवभक्तांना तातडीने आरोग्य सुविधा देण्यात आली.
शिवभक्तांसाठी अन्नछत्र
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आलेल्या शिवभक्तांसाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगडतर्फे अन्नछत्र सुरू करण्यात आले होते. त्यामुळे अन्नछत्राच्या ठिकाणी शिवभक्तांनी जेवणाचा आस्वाद घेतला.