Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 09:07 IST2025-11-18T09:05:42+5:302025-11-18T09:07:25+5:30
Raigad Civic Polls: रायगड जिल्ह्यातील १० नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी ५९, तर नगरसेवकपदांसाठी ९०० अर्ज दाखल झाले आहेत.

Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड जिल्ह्यातील १० नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी ५९, तर नगरसेवकपदांसाठी ९०० अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. जिल्ह्यात अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, महाड, पेण, कर्जत, खोपोली, माथेरान आणि उरण अशा दहा नगरपरिषदांसाठी निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती.
अजित पवार गटात बंडखोरी
रोहा नगरपालिकेत नगरसेवकपदाच्या २० जागांसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या खूप असल्याने पक्षश्रेष्ठींसमोर अनेक पेच निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत काही होतकरू कार्यकर्त्यांचा पत्ता कट झाल्याने त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे.
बच्चू कडू यांचे दोन उमेदवार
महाड नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रथमच बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने उडी घेतली असून, २ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे, तर एका अपक्षानेही अर्ज भरला.
शिंदेसेनेच्या दोन महिलांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज
मुरुड-जंजिरा नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेसेनेकडून कल्पना संदीप पाटील यांनी कालच नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज पुन्हा शिंदेसेनेच्या माजी नगराध्यक्षा स्नेहा किशोर पाटील यांनीही पक्षांकडून नगराध्यक्षपदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पक्षामध्ये खळबळ उडाली असून, मुरुड शहरात चर्चेला उधाण आले आहे.
कोंडीमुळे एकाचा मृत्यू
खोपोली नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी खोपोली ते शीळ फाटादरम्यान प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीमुळे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला शीळ फाट्याहून खोपोलीला रुग्णालयात पोहोचायला गर्दीमुळे एक तास उशीर झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
अंबरनाथमध्ये प्रचंड गर्दी झाल्याने उमेदवार, समर्थकांचे अतोनात हाल
- अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीतील ५९ जागांसाठी तब्बल ३८० अर्ज दाखल झाले, तर बदलापुरात ४९ जागांसाठी १३२ अर्ज सोमवारी अखेरच्या दिवशी दाखल झाले. अर्ज दाखल करण्याकरिता उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी तुफान गर्दी केल्याने अनेकांचे व मुख्यत्वे महिलांचे अतोनात हाल झाले. प्रशासनाने गर्दी होईल हे माहीत असूनही पुरेशी खबरदारी न घेतल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
- अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असल्यामुळे उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली. बदलापुरात शिंदेसेना आणि भाजप स्वतंत्र निवडणूक लढवत असून महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवत आहे. या ठिकाणी ४९ जागांसाठी १३२ अर्ज दाखल झाले. सर्वच राजकीय पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी एबी फॉर्म देण्यास विलंब लावला त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दी झाली.
- संभाव्य गर्दीची कल्पना असताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गर्दीचे योग्य नियोजन केले नाही. त्यामुळे उमेदवारांचे प्रचंड हाल झाले. ज्या इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज मिळाला नाही त्यांनी लागलीच दुसऱ्या पक्षात प्रवेश करून त्या ठिकाणचा ‘एबी’ फॉर्म मिळवला. इच्छुक उमेदवारांबरोबर अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ वाहतूककोंडी झाली होती.
उमेदवारांची गर्दी वाढल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्जाची छाननी प्रक्रिया थांबवत थेट उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले.
पालघरमध्ये नगराध्यक्षपदासाठी दाखल झाले ३४ अर्ज
- जिल्ह्यात पालघर, डहाणू, जव्हार या तीन नगरपालिका, तर वाडा या एका नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. यात नगराध्यक्षपदाच्या जागांसाठी ३४ अर्ज, तर नगरसेवकपदाच्या ९४ जागांसाठी ४६६ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
- निवडणुकांसाठी सोमवार १० नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, तर एक दिवस रविवारी वाढवून दिल्याने एकूण आठ दिवसांचा कालावधी उमेदवारांना मिळाला. मात्र, अनेकांनी शेवटच्या दोन-तीन दिवसांत अर्ज भरायला गर्दी केली होती.
- पालघर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदासाठी १२ अर्ज, तर नगरसेवकपदासाठी १७२ अर्ज, डहाणू नगरपालिकेमधील नगराध्यक्षपदासाठी ४ अर्ज, नगरसेवकपदासाठी ८३ नामनिर्देशनपत्र, जव्हार नगराध्यक्षपदासाठी ८ अर्ज, तर नगरसेवक पदासाठी ११० अर्ज, वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी १० अर्ज, तर नगरसेवकपदासाठी १०१ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.