रायगडमध्ये प्रशासनासमोर निसर्गाच्या अडचणींचे ‘वादळ’, अनेक भागांत आर्थिक मदत मिळण्यास अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 12:43 AM2020-07-05T00:43:02+5:302020-07-05T00:44:06+5:30

प्रशासनासमोर कोरोनाचे आव्हान आणि बँक व्यवहारातील तांत्रिक अडचणींमुळे जिल्हा प्रशासन हतबल असल्याचे चित्र आहे.

In Raigad, the administration is facing a 'storm' of Nisarga's calamities, difficulties in getting financial help in many areas | रायगडमध्ये प्रशासनासमोर निसर्गाच्या अडचणींचे ‘वादळ’, अनेक भागांत आर्थिक मदत मिळण्यास अडचणी

रायगडमध्ये प्रशासनासमोर निसर्गाच्या अडचणींचे ‘वादळ’, अनेक भागांत आर्थिक मदत मिळण्यास अडचणी

Next

- आविष्कार देसार्ई
रायगड : जिल्ह्यात ३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाला एक महिना उलटून गेला आहे. सरकारने ३७४ कोटी रुपये जिल्ह्याच्या उभारणीसाठी दिले. मात्र, प्रशासकीय पातळीवरून मदत पोहोचण्यास विलंब होत आहे. प्रशासनासमोर कोरोनाचे आव्हान आणि बँक व्यवहारातील तांत्रिक अडचणींमुळे जिल्हा प्रशासन हतबल असल्याचे चित्र आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे तब्बल सव्वा लाख घरांची पडझड झाली होती, तर १५ हजारांहून अधिक विजेचे खांब पडल्याने १,९०६ गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. नारळ, सुपारी, आंबा, काजू, कोकम अशी नगदी पिके देणाऱ्या हजारो हेक्टरच्या बागा उद्ध्वस्त झाल्याने बागायतदार मोडून पडले. जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू झाला.
वादळानंतर नुकसानीचे पंचनामे करण्यास तातडीने सुरुवात करण्यात आली. कोकणाला तब्बल सव्वाशे वर्षांनी अशी आपत्ती आल्याने राज्यातील दिग्गज नेत्यांसह मंत्र्यांचे दौरे सुरू झाले. रायगड जिल्ह्याचे तब्बल पाच हजार कोटी रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जाहीर केले.
खासदार सुनील तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मदत देण्याबाबतचे काही महत्त्वाचे सरकारी निर्णय बदलून घेतले, जेणेकरून प्रत्येक नुकसानग्रस्तांना जास्तीतजास्त मदत मिळेल. आधी नारळ आणि सुपारी पिकांना मदतीच्या निकषात आणले नव्हते, तटकरे यांनी सरकारी निर्णयात बदल करून घेतले आहेत, परंतु हेक्टरी ५० हजार रुपयांची मदतही अपुरी असल्याचे बागायतदारांचे मत आहे. प्रत्येक झाडामागे नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे.

३७४ कोटी करणार खर्च
1एकूण ३७४ कोटी ३ लाख १६ हजार रुपये सरकारकडून रायगड जिल्हा प्रशासनाकडे जमा झाले. त्यापैकी २८४ कोटी ८ लाख ६६ हजार ३५९ रुपयांचे अनुदान जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यांच्या आवश्यकतेनुसार पाठविले आहे.
2त्याचप्रमाणे, ८९ कोटी ९४ लाख ४९ हजार ६४१ रुपये इतका निधी जिल्हा प्रशासनाकडे शिल्लक असल्याचे दिसते. त्यापैकी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना साहाय्य आणि पूर्ण घरे पडलेल्या आपादग्रस्तांसाठी १६ कोटी ४ लाख रुपये देण्यात आले आहेत.
3पूर्णत: नष्ट, अंशत: पडझड झालेल्या कच्च्या-पक्क्या घरांसाठी २४३ कोटी १२ लाख ६३ हजार ८२९ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

अलिबाग मुरुड, माणगावला मिळणारी मदत कमीच

चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदत पोहोचत असल्याचे प्रशासन सांगत असले, तरी अलिबाग, मुरुड आणि माणगावकरांना मदत मिळण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. येथील महसूल कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्यामुळे कार्यालय सील करण्यात आली आहेत. त्यामुळे ही मदत पोहोचण्यास विलंब होत आहे, तर श्रीवर्धन, म्हसळा आणि तळा परिसरातील नुकसानीचे पंचनामे होऊन सुमारे ७५ टक्के मदत पोहोचल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

आरोप-प्रत्यारोप
निसर्ग चक्रीवादळातील आपादग्रस्तांना मदत वाटपात दुजाभाव, विलंबाबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारला धारेवर धरले आहे, तर टीका करणे सोपे असते. प्रत्यक्ष काम केल्यावर परिस्थिती समजेल. केंद्रात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे एनडीआरएफच्या निकषात बदल करण्यास सरकारला भाग पाडा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी फडणवीस आणि दरेकर यांना दिला. केंद्राने लवकरात लवकर कोकणाला मदत द्यावी, अशी मागणीही तटकरे यांनी केली आहे. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळामुळे विरोधक आमनेसामने आले असल्याचे दिसून येते.

1सार्वजनिक ठिकाणी जमा झालेला कचरा व कचºयाचे ढीग उचलण्यासाठी अडीच कोटींची तरदूत करण्यात आली होती. यापैकी ६० लाख ३० हजार ५३० रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. दुकानदार आणि टपरीधारकांना १ कोटीचे अर्थसाहाय्य वाटप करण्यात आले आहे. मत्स्य बोटी, जाळी आणि मत्स्यबीज शेतींसाठी २० लाख ८७ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले आहे, परंतु त्यांचे तब्बल एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, सरकारकडून अद्यापही उर्वरित रक्कम जमा झालेली नसल्याने मदत वाटलेली नाही.

2पशुधन खरेदीकरिता अर्थसाहाय्य देण्यासाठी ६० लाख ८५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. चक्रीवादळापूर्वी सुरक्षिततेच्या कारणास्तव काही लोकांना छावण्यांमध्ये हलविले होते. या नागरिकांना अन्न, पाणी, निवारा आणि वैद्यकीय देखभालीसाठी तब्बल ५० लाख रुपये खर्च झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २२ कोटींंचे वाटप केले.

Web Title: In Raigad, the administration is facing a 'storm' of Nisarga's calamities, difficulties in getting financial help in many areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.