तीन वेळा भूमिपूजन, तरी नळपाणी योजना बासनात; म्हसळ्यात यंदाही पाणीटंचाईची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 11:26 PM2019-12-12T23:26:43+5:302019-12-12T23:28:06+5:30

संघर्ष समिती ऐन हिवाळ्यात आंदोलनाच्या पवित्र्यात; टँकर पुरवठ्यातही घोळ

The possibility of water scarcity even in mhaslyat | तीन वेळा भूमिपूजन, तरी नळपाणी योजना बासनात; म्हसळ्यात यंदाही पाणीटंचाईची शक्यता

तीन वेळा भूमिपूजन, तरी नळपाणी योजना बासनात; म्हसळ्यात यंदाही पाणीटंचाईची शक्यता

Next

-उदय कळस 

म्हसळा : म्हसळा नगरपंचायत हद्दीत गेल्या चार-पाच वर्षांपासून मार्च ते जून या काळात भीषण पाणीटंचाईची समस्या उद्भवते. टंचाईवर मात करण्यासाठी नळ पाणी योजना मंजूर करण्यात आली. या योजनेचे भूमिपूजनही एकदा, दोनदा नव्हे, तर तीन वेळा करण्यात आले. मात्र, त्यानंतर योजना कार्यान्वित करण्यात संबंधित प्रशासनाला अपयश आले आहे.

नळपाणी योजनेच्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष करून तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांकडून, अनावश्यक विंधण विहिरी खणून त्यातील दूषित पाण्याचा पुरवठा शहरातील बहुतांशी भागात केला गेला. त्यामुळे शहरात व तालुक्यातील नागरिकांचे आरोग्यही बिघडले आहे.
यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी मार्च ते जून या महिन्यांदरम्यान पाणीटंचाई होईल, असे अभ्यासपूर्ण विधान म्हसळा नगरपंचायतचे मुख्याधिकारी मनोज उकिरडे यांनी म्हसळा नगराध्यक्ष निवडीनंतर घेतलेल्या पत्रकार भेटीदरम्यान केले. या वेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा जयश्री कापर याही उपस्थित होत्या. गतवर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी म्हसळा नगरपंचायतीने १६ लाख रुपये खर्च केल्याची माहितीही मुख्याधिकारी यांनी या वेळी दिली.

शहरातील भीषण पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी म्हसळा पाणी संघर्ष समिती स्थापन करून गतवर्षी १० मे रोजी पाणीटंचाईबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे ठोस उपाययोजना करण्याबाबत निवेदन दिले होते. याबाबत ठोस कार्यवाही न केल्यास तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला होता.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नळपाणी योजना कार्यान्वित करण्याऐवजी शहरात टँकरने पाणीपुरवठा केला गेला. त्यामध्ये मुख्याधिकारी यांचे अर्थपूर्ण राजकारण असल्याचे आरोप होत असून याच्या सखोल चौकशीची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना शुद्ध, पुरेसे आणि पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे निर्देश असल्याने ते पूर्ण करण्याच्या मागणीसाठी पाणी संघर्ष समिती अध्यक्ष सुशील यांच्या नेतृत्त्वाखाली नागरिकांनी १४ मे २०१९ रोजी मोर्चाही काढला होता.

या वेळी आंदोलकांना शांत करण्यासाठी नायब तहसीलदार के. टी. भिंगारे यांनी पुढील वर्षी पाणीटंचाई न होण्यासाठी म्हसळा नगरपंचायत सर्वोतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, मुख्याधिकारी उकिरडे यांनी यंदाही पाणीटंचाईची शक्यता वर्तवल्याने ऐन हिवाळ्यातच पाण्यासाठी आंदोलनाचे संकेत पाणी संघर्ष समिती म्हसळाकडून मिळाले आहेत.

म्हसळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी केलेल्या विधानानुसार जर यंदाही पाणीटंचाई होणार असेल, तर पाणी संघर्ष समितीच्या सदस्यांसमवेत चर्चा करून पुढील आंदोलनाचा निर्णय घेण्यात येईल.
- सुशील यादव, अध्यक्ष पाणी संघर्ष समिती, म्हसळा

Web Title: The possibility of water scarcity even in mhaslyat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.