धाकट्या भावाकडूनच कुटुंबावर विषप्रयोग; उपासमार व नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 07:56 IST2025-10-26T07:56:37+5:302025-10-26T07:56:37+5:30
विषारी औषधानेच नेपाळी लुहार कुटुंबांतील चारही सदस्यांना मृत्यूच्या दारात नेले

धाकट्या भावाकडूनच कुटुंबावर विषप्रयोग; उपासमार व नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल
उरण : दोन्ही कर्त्या पुरुषांच्या नोकऱ्या गेल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी पैसे नाहीत, कुटुंबीयांवर अवलंबून असलेल्या आईवडिलांना पाठविण्यासाठी पैसे नाहीत. यामुळे होणारी उपासमार व नैराश्यातून मयत धाकट्या भावानेच जेवणातून विषारी औषध मिसळून दिले होते. या विषारी औषधानेच नेपाळी लुहार कुटुंबांतील चारही सदस्यांना मृत्यूच्या दारात नेले. सुदैवाने पती-पत्नी आणि दोन्ही मुलांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असल्याची माहिती उलवे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्जुन रांजणे यांनी शुक्रवारी दिली.
उलवे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जावळे गावात भाड्याने राहणाऱ्या नेपाळी कुटुंबीयातील रमेश लुहार (वय २७), पत्नी बसंती लुहार (२५), धाकटा भाऊ संतोष कुमार (२२) आणि मुलगा आयुष (५) व आर्यन (३) या पाचही सदस्यांनी गुरुवारी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मयत धाकटा भाऊ संतोष कुमार (२२) यानेच जेवणातून सर्वानाच विषारी औषध मिसळून दिले होते. पाच सदस्यांपैकी धाकटा भाऊ संतोष लुहार (२२) याचा या घटनेत दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. मात्र, लुहार पती-पत्नी आणि दोन्ही मुलांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनीच ही माहिती दिल्याचे अर्जुन रांजणे म्हणाले.