परळ-अलिबाग एसटी बस चालकाला आंदाेलकांनी दिला बांगड्यांचा आहेर, तर कार्लेखिंड येथे मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 16:48 IST2021-11-08T16:48:12+5:302021-11-08T16:48:28+5:30
राज्य सरकारमध्ये विलीन करण्याच्या प्रमुख मागणीसह एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांनी अन्य मागण्यांसाठी राज्यभर संप पुकारला आहे.

परळ-अलिबाग एसटी बस चालकाला आंदाेलकांनी दिला बांगड्यांचा आहेर, तर कार्लेखिंड येथे मारहाण
राज्य सरकारमध्ये विलीन करण्याच्या प्रमुख मागणीसह एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांनी अन्य मागण्यांसाठी राज्यभर संप पुकारला आहे. रायगड जिल्ह्यातही संप सुरु आहे. अलिबाग आगारातही याबाबत आंदाेलन सुरु आहे. असे असताना आज सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास परळ-अलिबाग एसटी प्रवाशांना घेऊन आल्याने आंदाेलक चांगलेच संतापले. त्यांनी संबंधित चालकाला बांगड्यांचा आहेर दिला, तर वाहकाच्या गळ्यात पुष्पमाला घालून निषेध व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. अलिबाग आगारामध्ये सकाळी परळ-अलिबाग एसटी आली. परळहून एसटी आल्याचे पाहील्यावर अलिबाग आगारातील आंदाेलकांचा पार चांगलाच चढला. आंदाेलन सुरु असताना तुम्ही एसटी आणलीच कशी, याचा जाब त्यांनी संबंधित चालकाला आणि वाहकाला विचारला. त्यानंतर महिला आंदाेलकाने चालकाला बांगड्यांचा आहेर दिला तर महिला वाहकाच्या गळ्यात पुष्पमाळा घालत निषेध व्यक्त केला.
दरम्यान, सदरची एसटी कार्लेखिंड येथे सकाळी दहा-सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास आली तेव्हा दाेन अज्ञातांनी बसमध्ये प्रवेश करत संबंधीत चालकाला मारहाण केली. या घटनेची नाेंद अलिबाग पाेलीस ठाण्यात करण्यात आली आहे.बस चालकाचे नाव काशिनाथ गायकवाड असे आहे.