Panchnama of Rs 22 crore, allotment of only Rs 12 crore; Anger in nature hurricane victims | पंचनामे २२ कोटींचे, वाटप मात्र १२ कोटींचेच; निसर्ग चक्रीवादळ अपादग्रस्तांमध्ये संताप

पंचनामे २२ कोटींचे, वाटप मात्र १२ कोटींचेच; निसर्ग चक्रीवादळ अपादग्रस्तांमध्ये संताप

उदय कळस

म्हसळा : निसर्ग चक्रीवादळामुळे म्हसळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. प्रशासनाने २२ कोटी रुपयांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत, पैकी आतापर्यंत ११ कोटी ८७ लाख २० हजार २६१ रुपयांचे अनुदान प्रशासनामार्फत वितरीत करण्यात आले आहे. अद्यापही नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात विलंब होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी १०० कोटींची तातडीची मदत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केली. चक्रीवादळाच्या तडाख्यात उद्ध्वस्त झालेल्या रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने आणखी ३०१ कोटींची मदत जाहीर केली आहे.
एकत्रीत ३७३ कोटी रुपयांची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे जमा झाली आहे.

म्हसळा तालुक्यातील म्हसळा नगरपंचायत व ३९ ग्रामपंचायतीतील प्रत्येक गाववाडींत एकूण १५ हजार ५७९ दुर्घटना घडल्या.
त्यामध्ये प्रामुख्याने एक जीवित हानी, ३१ मृत जनावरे, ३ पोल्ट्री फॉर्म, १८३ पूर्णत: पडलेली घरे, १४ हजार ४९४ अशंत: पडलेली घरे, २३ झोपड्या, ७८१ गुरांचे गोठे, ६३ दुकान टपऱ्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे ७ हजार ८३ लाभार्थ्यांचे अपरिमीत नुकसान झाले. सुमारे २१ कोटी ९८ लाख २८ हजार ३३९ नुकसानीचे पंचनामे करण्यात प्रशासनाला यश आले. प्रशासनाने आता मदत वाटपाला सुरुवात केली आहे. तालुक्यातील काही अपादग्रस्ताना ११ कोटी ८७ लाख २० हजार २६१ रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. मात्र मदत वाटपामध्ये विलंब होत असल्याने आपादग्रस्तांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

१८६३.६१ हेक्टर क्षेत्रांतील फळबागायतीचे नुकसान
म्हसळा तालुक्यांतील ४४२५ बाधित शेतकऱ्यांचे १८६३.६१ हेक्टर क्षेत्रांतील फळबागायतीचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये आंबा क्षेत्र १३४८.०९ हेक्टर, काजू ३८९.५ १ हेक्टर, नारळ ५ ०.२० हेक्टर, सुपारी २९.३१ हेक्टर इतर फळपिके ४६.५० या बागायती क्षेत्रात नुकसान झाले आहे. फळपिकांसाठी पूर्वी १८ हजार रुपये प्रति हेक्टरी नुकसान देण्यात येत होते. सरकार बागायतदारांना ५० हजार प्रति हेक्टरी नुकसान देणार आहे.

वाढीव नुकसान भरपाईचे काय झाले?
पहिल्या जीआरनुसार नुकसानग्रस्तांना प्रत्येकी १५ हजार नुकसान भरपाई देण्याचे आदेश प्राप्त झाले होते; परंतु त्यानंतर सरकारच्या नवीन आदेशानुसार नुकसानग्रस्तांना १५ हजार रुपये अधिक १० हजार वाढीव असे एकूण प्रत्येकी २५ हजार रुपये देण्याचे आदेश असतानाही वाटप का करण्यात आले नाही?असा प्रश्न उपस्थित केला आहे. म्हसळा तहसील कार्यालयातील संबंधित कर्मचाºयाजवळ विचारणा केली असता काहीही सांगण्यास नकार देण्यात आला. याबाबत पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी पाठपुरावा करून नुकसानग्रस्तांना न्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे.

तालुक्यातील अपादग्रस्ताना ११ कोटी ८७ लक्ष २० हजार २६१ रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. उर्वरित अनुदानही उपलब्ध आहे. लाभार्थींच्या खात्यावर अनुदान जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोणीही पात्र लाभार्थी अनुदानापासून वंचित राहणार नाही.
-शरद गोसावी, तहसीलदार, म्हसळा

Web Title: Panchnama of Rs 22 crore, allotment of only Rs 12 crore; Anger in nature hurricane victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.