जेएनपीए परिसरात सहा वर्षांपूर्वी सिडकोने कमी केलेल्या २५ सुरक्षा रक्षकांच्या नेमणूका करण्याचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 07:27 PM2024-03-21T19:27:24+5:302024-03-21T19:27:41+5:30

उरण परिसरातील वाढत्या औद्योगिक विकासामुळे वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे.

Order to appoint 25 security guards who were reduced by CIDCO six years ago in JNPA premises | जेएनपीए परिसरात सहा वर्षांपूर्वी सिडकोने कमी केलेल्या २५ सुरक्षा रक्षकांच्या नेमणूका करण्याचे आदेश 

जेएनपीए परिसरात सहा वर्षांपूर्वी सिडकोने कमी केलेल्या २५ सुरक्षा रक्षकांच्या नेमणूका करण्याचे आदेश 

मधुकर ठाकूर 

उरण: उरण तालुक्यातील वाहतूक कोंडी व वाढत्या अपघातांना नियंत्रणात आणण्यासाठी सिडकोने नेमणूक करून सहा वर्षांपूर्वी कमी केलेल्या २५ सुरक्षा रक्षकांची पुन्हा नेमणूक करण्याचे आदेश सिडकोने रायगड सुरक्षा रक्षक मंडळाला आदेश दिले आहेत. उरण परिसरातील वाढत्या औद्योगिक विकासामुळे वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. जेनएपीए बंदरातुन वर्षाकाठी सुमारे ७५ लाख कंटेनरची आयात-निर्यात केली जात आहे. २० वर्षांपूर्वी असलेले अपुरे-अरुंद रस्ते, वाढता व्यापार आणि वाढत्या रहदारीमुळे जेएनपीए परिसरातील विविध रस्त्यांवर होणारी वाहतूकीची कोंडी आणि अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती.

वाढते अपघात आणि होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. याबाबत विविध सामाजिक संस्था, विविध राजकीय पक्षांचे नेते, नागरिक आणि सिडको, जेएनपीए, नवीमुंबई पोलिस आयुक्त आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठकीत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीला अनुसरून परिसरात होणारीवाहतूकीची कोंडीची समस्या आणि वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी जेएनपीएचे २५ तर सिडकोचे २५ असे ५० सुरक्षा रक्षकांच्या नेमणूका करण्यात आल्या होत्या. 

मात्र २०१७ पासून अचानक सिडकोने आता वाहतूक कोंडी आणि अपघाताचे प्रमाण कमी झाले असल्याचे कारण पुढे करून कार्यरत असलेल्या २५ वाहतूक नियंत्रण करणारे सुरक्षा रक्षक कमी करण्यात आले होते. सिडकोच्या या अनाठायी कृती विरोधात नाराजी व्यक्त करुन सुरक्षा रक्षकांची पुन्हा नेमणूक करण्यासाठी सिडको तसेच विविध शासकीय विभागांकडे मागणी केली होती. त्यावर चर्चा, बैठकाही झाल्या. मात्र त्यानंतरही सुरक्षा रक्षकांची  नेमणूका करण्यात सिडकोने स्वारस्य दाखवले नाही. यामुळे न्यायासाठी उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

मात्र न्यायालयाच्या निर्णयाआधीच उरण सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. यानंतर सिडकोने वाहतूक नियंत्रण करण्याकामी २५ सुरक्षा रक्षकांच्या पुन्हा नेमणूका करण्याचे आदेश २० मार्च रोजी रायगड सुरक्षा रक्षक मंडळाला दिले आहेत. तसेच नवीमुंबई वाहतूक पोलीस विभागाला कळविण्यात आली असल्याची माहिती उरण सामाजिक संस्थेचे सचिव संतोष पवार यांनी दिली.

Web Title: Order to appoint 25 security guards who were reduced by CIDCO six years ago in JNPA premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.