रिक्षा झाडाला धडकून एक ठार; दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 23:13 IST2019-02-26T23:13:08+5:302019-02-26T23:13:17+5:30
चौक- कर्जत राज्यमार्गावर अपघात

रिक्षा झाडाला धडकून एक ठार; दोघे जखमी
मोहोपाडा : चौक-कर्जत राज्यमार्गावर अवघड वळणावर सोमवारी संध्याकाळी रिक्षाचालक श्रीराम नामदेव राणे (३३, रा. कुसगाव, बदलापूर) यांचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने झाडाला रिक्षा धडकून अपघात झाला. यात श्रीराम राणे यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन प्रवासी जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मुन्ना शेख याने पोलिसांना दिली. शेख आणि त्यांची मैत्रीण साक्षी श्रीराम यांच्या रिक्षातून कर्जतहून चौककडे निघाले होते. खालापूर हद्दीत वडविहीर गावानजीक वळणावर रिक्षाचालक श्रीराम यांचे रिक्षावरील नियंत्रण सुटून रिक्षा झाडाला जाऊन धडकली. या अपघातात रिक्षाचा पुढचा भाग चेपला जाऊन रिक्षाचालक श्रीराम यांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षात मागे बसलेले मुन्ना शेख आणि साक्षी हे दोघे प्रवासी जखमी झाले.
अपघाताची माहिती चौक पोलीस दूरक्षेत्र येथे दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. रिक्षाचालक श्रीराम राणेंच्या मृतदेहाचे खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस पुढील तपास करत आहेत.