३,५७१ नागरिकांमागे एक आरोग्य कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 12:30 AM2020-08-01T00:30:24+5:302020-08-01T00:30:35+5:30

रायगडमधील आरोग्य व्यवस्था कमकु वत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वास्तव समोर

One health worker for every 3,571 citizens | ३,५७१ नागरिकांमागे एक आरोग्य कर्मचारी

३,५७१ नागरिकांमागे एक आरोग्य कर्मचारी

Next

आविष्कार देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सर्वांसाठीच डोकेदुखी ठरत आहे. सरकार आणि जिल्हा प्रशासन यावर उपाययोजना करत आहे. मात्र, कमकुवत असलेल्या आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून कोरोनाशी झुंज द्यावी लागत आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येचा विचार करता, तीन हजार ५७१ नागरिकांमागे एक आरोग्य कर्मचारी सेवा देत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.


कोरोनामुळे अद्यापही जिल्ह्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय माणगाव, उपजिल्हा रुग्णालय पेण, उपजिल्हा रुग्णालय कर्जत, उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन, उपजिल्हा रुग्णालय रोहा, उपजिल्हा रुग्णालय पनवेल (ट्रामा केअर), ग्रामीण रुग्णालय उरण, ग्रामीण रुग्णालय कशेळे, ग्रामीण रुग्णालय मुरुड, ग्रामीण रुग्णालय पोलादपूर, ग्रामीण रुग्णालय महाड ट्रामा केअर, ग्रामीण रुग्णालय जसवलीस, ग्रामीण रुग्णालय, म्हसळा, ग्रामीण रुग्णालय चौक, नगरपालिका दवाखाना माथेरान, नगरपालिका दवाखाना पनवेल, नगरपालिका दवाखाना रोहा या माध्यमातून जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण अशा १८ ठिकाणी आरोग्य सेवा देण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. मात्र, या ठिकाणी डॉक्टरांपासून ते वर्ग चारपर्यंत कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे.


सध्या सर्वत्र कोरोना महामारीचे संकट गहिरे झालेले आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळामध्ये आरोग्य यंत्रणेला कोरोनाशी दोन हात करावे लागत आहेत. आरोग्य विभागात वर्ग एकची ३३ पदे मंजूर आहेत. पैकी सात पदे भरलेली आहेत, तर २६ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे, वर्ग-२ची १२५ पदे मंजूर आहेत. त्यातील १०९ पदे भरलेली आहेत आणि १६ पदे रिक्त आहेत. गट-बमधील २० पदे मंजूर, ११ पदे भरलेली तर ९ पदे रिक्त आहेत. वर्ग-३मधील ५९० पदे मंजूर, ४४१ पदे भरलेली, तर १४९ पदे रिक्त आहेत. वर्ग-४मधील ३२६ पदे मंजूर आहेत, त्यापैकी १६० पदे भरलेली आहेत, तर १६६ पदे रिक्त आहेत. अशी एकूण १,०९४ पदे मंजूर आहेत, त्यापैकी ७२८ पदे भरलेली आहेत, तर ३६६ पदे रिक्त आहेत.

14,456 नागरिकांना जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
च्सरकारी रुग्णालयांमध्ये सर्वसाधारण तपासणीसाठी येणारी रुग्णांची संख्या कमी असल्याने, सध्या कोरोनाचेच रुग्ण जास्त प्रमाणात सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असल्याचे दिसून येते. जिल्हा पातळीवरून रिक्त जागा भरण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येते. मात्र, त्याला अद्याप म्हणावे तसे यश आलेली दिसत नाही.
प्रभाव असणारे तालुके
च्पनवेल, पेण, अलिबाग, खालापूर, उरण, रोहा या तालुक्यांमध्ये ५०० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. १००पेक्षा अधिक रुग्ण असणारे तालुके मुरुड, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, कर्जत, महाड तर पोलादपूर, तळा आणि पाली-सुधागड या तालुक्यांमध्ये १००पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत.

माणगाव तालुक्याची लोकसंख्या १,५९,६१३ आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये ७२ (१ ते ४ वर्गापर्यंत) पदे भरलेली आहेत. त्यानुसार, २,२१६ नागरिकांमागे एक आरोग्य कर्मचारी सेवेसाठी आहे.
पेण तालुक्याची लोकसंख्या १,९५,४५४ येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये ४१ (१ ते ४ वर्गापर्यंत) पदे भरलेली आहेत. त्यानुसार, ४,७६७ नागरिकांमागे एक आरोग्य कर्मचारी आहे.
पनवेल तालुक्याची लोकसंख्या ७,५०,२३६ येथील उपजिल्हा रुग्णालय आणि नगरपालिका दवाखान्यामध्ये ७६ (१ ते ४ वर्गापर्यंत) पदे भरलेली आहेत. त्यानुसार, ९,८७१ नागरिकांमागे एक आरोग्य कर्मचारी आहे.
कर्जत तालुक्याची लोकसंख्या २,१२,०५१ येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये ३८ आणि माथेरान नगरपालिका दवाखाना १ अशी एकूण ३९ (१ ते ४ वर्गापर्यंत ) पदे भरलेली आहेत. त्यानुसार, ५,५८० नागरिकांमागे एक आरोग्य कर्मचारी आहे.

Web Title: One health worker for every 3,571 citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.