सडा, रांगोळी अन् गुढी उभारली; मराठमोळ्या पेहरावात शोभायात्रा

By निखिल म्हात्रे | Published: April 9, 2024 06:02 PM2024-04-09T18:02:18+5:302024-04-09T18:03:21+5:30

अलिबाग शहर मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास ढोलताशांच्या गजरात दुमदुमले होते.

on the occasion of gudi padwa rangoli and gudi erected parade in alibaug | सडा, रांगोळी अन् गुढी उभारली; मराठमोळ्या पेहरावात शोभायात्रा

सडा, रांगोळी अन् गुढी उभारली; मराठमोळ्या पेहरावात शोभायात्रा

निखिल म्हात्रे, अलिबाग:अलिबाग शहर मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास ढोलताशांच्या गजरात दुमदुमले होते. ठिकठिकाणी शहरातील रस्त्यांवर रांगोळ्यांचे सडे घालण्यात आले होते. शहराच्या मुख्य रस्त्यांवर नववर्षाच्या शुभेच्छांच्या स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. याबरोबरच महत्त्वाच्या चौकात मराठी नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने गुढी ही उभारण्यात आली होती.

गुढीपाडव्यानिमित्ताने अलिबाग शहरात आयोजित मराठी नववर्ष स्वागत यात्रेत तरुणाई आणि महिलांचा प्रचंड उत्साह पाहण्यास मिळाला. मराठमोळ्या पेहरावातील आबाल-वृद्ध आणि त्याचबरोबर महिलांचे ढोलपथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. सकाळी शहरातील ब्राम्हण आळीमधील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात गुढीची विधिवत पूजा केल्यावर या नववर्ष स्वागत यात्रेस उत्साहात प्रारंभ झाला.

सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे घोड्यावरुन या शोभायात्रेत सहभागी झाले होते. शहरातील विविध गणेश मंडळे, नवरात्र मंडळे, विविध संस्था, ज्ञाती मंडळे आणि विविध युवा मंडळे तसेच क्रीडा मंडळ या सह सर्वपक्षीय राजकीय व्यक्तीमत्वे या स्वागत यात्रेत सहभागी झाले होते.

राममंदिर, महाविरचौक, शिवाजी चौक, ठिकरुळ नाका, शिवलकर नाका, बाजारपेठमार्गे ही नववर्ष स्वागत यात्रा वळविण्यात आली होती. त्यानंतर काशी विश्वेश्वर मंदिराजवळ आल्यावर सांगता झाली. प्रतिवर्षी या स्वागत यात्रेत नागरिकांचा सहभाग वाढत आहे. ऐतिहासिक पेहेरावातील घोडेस्वार, घोडागाड्या, मल्लखांब पथके, आणि तालुक्यांतील विविध बॅन्ड पथके यांचा सहभाग हे या नववर्ष यात्रेचे एक वैशिष्ट्य होते. यावेळी यात्रेस प्रोत्साहन देण्यासाठी अलिबाग- मुरुडचे आमदार महेंद्र दळवी, उदय जोशी, शोभा जोशी, प्रदिप नाईक, अनिल चोपडा, अॅड. अंकीत बंगेरा, विलास नाईक, सुनिल दामले, दर्शन प्रभु यांसह अनेक नागरिक उपस्थित होते.

साडेतीन मुहुर्तांपैकी एक महत्त्वाचा समजला जाणारा सण म्हणजे गुढीपाडवा. या सणाच्या निमित्ताने अलिबाग शहरातील ज्वेलर्समध्ये दागिने खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. सोन्याचा भाव जरी गगनाला भिडला असला तरी सोने खरेदीची हौस मात्र आजही कायम आहे. सोने खरेदी बरोबरच अलिबाग शहरात आज नवनवीन दुकाने, गाळे, कार्यालये यांची उद्घाटने करण्यात आली आहेत. तर काहींनी वाहन व फ्लॅट खरेदी करण्याकडे आपला मोर्चा वळविला होता.

Web Title: on the occasion of gudi padwa rangoli and gudi erected parade in alibaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.