रायगडात तापले ‘नॅपकिन’ राजकारण, तटकरेंच्या नकलेला गोगावलेंचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 15:14 IST2025-05-20T15:14:22+5:302025-05-20T15:14:36+5:30
अलिबाग : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी महाडचे आ. भरत गोगावले यांची नॅपकिनवरून नक्कल केल्यामुळे वादंग निर्माण ...

रायगडात तापले ‘नॅपकिन’ राजकारण, तटकरेंच्या नकलेला गोगावलेंचे प्रत्युत्तर
अलिबाग : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी महाडचे आ. भरत गोगावले यांची नॅपकिनवरून नक्कल केल्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. खा. तटकरे यांच्या या नक्कल करण्याला आ. गोगावले यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात नॅपकिनवरून गोगावले विरुद्ध तटकरे असे राजकीय वातावरण तापले आहे.
महाड येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. मेळाव्यात खा. तटकरे यांनी महाडचे आ. गोगावले यांच्यावर तोंडसुख घेतले. गोगावलेंच्या नॅपकिन वापरण्याची नक्कल करून तटकरेंनी भाषण संपवले. त्यानंतर नॅपकिन कसे ठेवायचे, कसे वापरायचे यांची ट्रेनिंग माझ्याकडून घ्या, असा टोला तटकरेंनी गोगावलेंना लगावला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे.
या वादामुळे जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्येही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
तुम्हाला ‘ट्रेनिंग देऊ, प्रोग्रामच ठेवू’
तटकरे एवढे नकलाकार असतील, असे वाटले नव्हते. भरतशेठच्या नॅपकिनची नक्कल सगळ्यांनाच करता येत नाही. तटकरेंनी वेटरसारखा नॅपकिन खांद्यावर घेतला आहे. नॅपकिनमध्ये गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत. खांद्यावर ठेवला तर पडतो, म्हणून काखेत ठेवतो, ही पद्धत आहे. मी काल-परवापासून नॅपकिन नाही वापरत, अनेक वर्षे वापरत आहे. तुम्हालाही सवय करायची असेल, तर ट्रेनिंग देऊ. पावसाळ्यानंतर एक प्रोग्राम ठेवू, अशा शब्दांत आ. गाेगावले यांनी खा. सुनील तटकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.