पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे सागरी नाकाबंदी; गेटवे-मांडवा, एलिफंटादरम्यान वाहतूक २ दिवस बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:12 IST2025-10-09T11:12:31+5:302025-10-09T11:12:41+5:30
PM Modi Mumbai Visit: गेटवे-मांडवा, एलिफंटादरम्यान वाहतूक २ दिवस बंद; २५ हजार अवजड वाहने अडकली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे सागरी नाकाबंदी; गेटवे-मांडवा, एलिफंटादरम्यान वाहतूक २ दिवस बंद
- मधुकर ठाकूर
लाेकमत न्यूज नेटवर्क
उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील दोन दिवसांच्या दौऱ्यात सुरक्षिततेसाठी मुंबई गेटवे सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली आहे. जेएनपीए बंदर व उरण परिसरातील वाहतूक बंद केल्याने सुमारे २५ हजार अवजड वाहने ठिकठिकाणी अडकून पडली आहेत.
बुधवारी सकाळपासूनच जेएनपीए व उरण परिसरातील अवजड वाहनांची कंटेनर वाहतूक बंद केली आहे. यामुळे उरण परिसरातील २२ हजार अवजड वाहने ठिकठिकाणच्या रस्त्यावर अडकून पडली असल्याची माहिती उरण वाहतूक नियंत्रण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी दिली. तर जेएनपीए परिसरातही सुमारे तीन हजार अवजड वाहने रस्तोरस्ती उभी असल्याची माहिती जेएनपीटी वाहतूक नियंत्रण विभागाचे वरीष्ठ पाेलिस निरीक्षक जी.एम. मुजावर यांनी दिली. सुमारे २५ हजार अवजड वाहने ठिकठिकाणच्या रस्त्यावर अडकून पडल्याने बंदरातील मालवाहतुकीवर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.
मालवाहतूक बंद असल्याने मोठा फटका
गेटवे येथील जलवाहतुकीची नाकाबंदी केली आहे. त्यामुळे गेटवे-एलिफंटा, गेटवे-मांडवा या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बुधवार, गुरुवारी बंद आहे. सरकारी आदेशानंतर ही वाहतूक बंद केल्याची माहिती गेटवे जलवाहतूक संस्थेचे सचिव इक्बाल मुकादम यांनी दिली. अवजड वाहतूकही बंद असल्याने फटका बसला आहे.
दिबांच्या नावाचा उल्लेख नसल्याने तीव्र नाराजी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लाेकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी साडेतीन वर्षांपासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आदी जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त, शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. उद्घाटनासाठी करण्यात आलेली बॅनरबाजी आणि होडिंग्ज, विविध फलकांवर दिबांच्या नावाचा कुठेही उल्लेख करण्यात आलेल्या नसल्याने विरोधकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.