मतदानाचा टक्का घसरला; ७८ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 12:34 AM2019-10-22T00:34:04+5:302019-10-22T00:35:42+5:30

Maharashtra Election 2019:रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात काही तुरळक प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यात सुमारे ६५.५७ टक्के मतदान झाले.

Maharashtra Election 2019: Voting fell sharply; Locked in the futuristic machine of the 78 candidates | मतदानाचा टक्का घसरला; ७८ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद

मतदानाचा टक्का घसरला; ७८ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद

googlenewsNext

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात काही तुरळक प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यात सुमारे ६५.५७ टक्के मतदान झाले. २०१४ च्या तुलनेत मतदानाचा टक्का तब्बल पाच टक्क्यांनी घसरला आहे. २०१४ साली ७०.२८ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे गाजावाजा करूनही मतदानाची टक्केवारी वाढवण्यात प्रशासनाला यश आले नसल्याचे दिसून येते.

सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी मतदारांचा चांगलाच उत्साह दिसून आला. प्रशासनाने सखी मतदान केंद्र तसेच दिव्यांगासाठी मतदान केंद्र उभारले होते. पेणमधील आनंदीबाई मोतीराम घरत या १०२ वर्षांच्या तर पोलादपूर येथील पिठाजी महादेव साळवी १०१ वर्षे असणाऱ्या मतदारांनी आपला हक्क बजावला. दुपारनंतर उन्हाचा जोर वाढल्याने मतदान धिम्या गतीने होत होते. त्यानंतर पुन्हा मतदारांनी उर्त्स्फूत मतदानाला बाहेर पडले. अलिबागमध्ये शिवसेना आणि शेकाप यांच्यामध्येच कडवी लढत झाली. या ठिकाणी शेकापची प्रतिष्ठा पणाला लागलेली असल्याने मतदान करून घेण्यावर दोन्ही कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती.

पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर, पेणमध्ये शेकापचे धैर्यशील पाटील, महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले आणि कर्जतमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड हे हॅट्ट्रिक साधण्याच्या तयारीत असल्याने त्यांच्यासह त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कमालीचा दबाव असल्याचे चित्र होते. पेणमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराला आल्याने रवींद्र पाटील यांना महत्त्व आले. त्यांचा विजय होण्यासाठी कार्यकर्त्यांची दिवसभर धावपळ सुरू होती.

अलिबागमध्ये सेना-शेकाप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात नऊ आणि पेण विधानसभेत एका ठिकाणी मतदार यंत्रात तांत्रिक बिघाड झाला होता. अलिबागमध्ये शिवसेना आणि शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.

वयाची शंभरी पार केलेल्या दोन मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी ७८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. २४ आॅक्टोबर रोजी निकाल लागणार असल्याने सर्वच उमेदवारांची घालमेल वाढली आहे.

११ ठिकाणी ईव्हीएम यंत्रात बिघाड

महाड मतदारसंघात सकळी मतदानास सुरुवात होताच जवळपास ११ ठिकाणी ईव्हीएम यंत्रात बिघाड झाल्याच्या घटना घडल्या. मात्र, राखीव यंत्र तत्काळ या ठिकाणी देण्यात येऊन अवघ्या काही मिनिटांतच मतदान पुन्हा पूर्ववत करण्यात आले. पळसगाव, चिंभावे, मुठवली, सडे, तेलंगे, नरवन, जुई, कुंभे, शिवथर, महाड या ठिकाणी ईव्हीएम यंत्रात बिघाड झाला होता.

कर्जत 69% मतदान

कर्जत : विधानसभा मतदारसंघात सकाळी मतदानाची सुरुवात झाली, तेव्हा पावसाचे सावट होते. मात्र, दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास ऊन पडले आणि मतदानाचा वेग वाढला. दुपारी ३ वाजेपर्यंत ५० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. ६ वाजेपर्यंत ६९ टक्के मतदान झाले. महिला मतदारांचे मतदान पुरुष मतदारांपेक्षा कमी होते. सर्वच ठिकाणी शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात मतदान झाले. ११ उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद झाले.

दोन लाख ८२ हजार २४७ मतदार असून, एक लाख ४३ हजार ४७८ महिला तर एक लाख ३८ हजार ७६९ पुरुष मतदार आहेत. सकाळी ९ वाजेपर्यंत ५.६५ टक्के च मतदान झाले. त्यामध्ये पुरुषांचे ८.८ टक्के तर महिलांचे फक्त ३.१४ टक्के मतदान झाले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत म्हणजे चार तासांत १८.२४ टक्के मतदान झाले. महिलांनी १३.९५ टक्के च मतदान केले होते. ५ वाजेपर्यंत एक लाख ८१ हजार आठ मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये ९४ हजार ८३४ पुरुष मतदारांचा तर ८६ हजार १७४ महिला मतदारांचा सहभाग आहे.

पेण 66% मतदान

पेण : विधानसभा मतदारसंघात पेण, सुधागड, रोहा, तालुक्यातील सर्व मतदार केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्थेत शांततेत मतदान पार पडले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४५ टक्के मतदान झाले. तर दुपारी १.०० वाजता ही मतदानाची टक्केवारी ३० टक्के होती. रिमझिम पाऊस सोमवारी सकाळपासून गायब झाला आणि मतदार व निवडणूक यंत्रणेने मोकळा श्वास घेतला. पेण विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६६ टक्के मतदान झाले.

सकाळी ९ वाजता १० टक्के, ११ वाजता १० टक्के आणि दुपारी १ वाजता १० टक्के अशा समप्रमाणात मतदानाची टक्केवारी चालत होती. दुपारी १ वाजता ४७,००० पुरुष तर ४४,१०० महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या वेळी एकूण मतदान ९१,१०० इतके होऊन ती मतदानाची टक्केवारी ३० टक्के इतकी झाली होती. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता आकडेवारीत भर पडत तो आकडाही त्याच समप्रमाणात वाढत ४४.४ टक्के झाला होता. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६२.५१ टक्के मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

श्रीवर्धन 61% मतदान

श्रीवर्धन : रायगड जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झालेल्या श्रीवर्धन मतदारसंघात ५५.६७ टक्के मतदान झाले. महाआघाडीच्या उमेदवार अदिती तटकरे आणि युतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्यात ‘काट्याची टक्कर’ झाली आहे. सकाळी ७ पासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत श्रीवर्धन मतदारसंघातील सर्व केंद्रावर शांततेत मतदान झाले. आठ मतदान कें द्रांवर ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाला. मात्र, तो तत्काळ दुरुस्त करून मतदान प्रक्रिया सुरू केली. मात्र, आराठी मतदान केंद्रावर सकाळी ११ ते ११.३५ पर्यंत मशिनमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे मतदारांना ताटकाळत उभे राहावे लागले.

श्रीवर्धनमध्ये मतदान केंद्र संख्या तालुक्यानुसार श्रीवर्धनमध्ये ९० केंद्र, म्हसळा ७०, तळा ५५, माणगाव ७४, रोहा ५७ आहे. स्त्री-पुरुष गुणोत्तरानुसार एक लाख ३१ हजार ४३१ स्त्री मतदार व एक लाख २६ हजार १०१ पुरुष मतदार होते. त्यापैकी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुरुष ७१,६९७ तर ७१,६७१ महिला अशा १,४३,३६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ६ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान झाले.

महाड 65% मतदान

दासगाव : १९४ महाड मतदारसंघामध्ये दिवसभरात उत्साहपूर्ण वातावरणात मतदान झाले. सकाळी मतदानाचे प्रमाण कमी होेते. मात्र, १० वाजल्यापासून हे प्रमाण वाढले. या मतदारसंघात असलेली मतदान टक्केवारी परंपरा या वेळीही कायम राहिली आहे. काही ठिकाणी ईव्हीएम यंत्रात बिघाड झाल्याच्या घटना घडल्या. मात्र, तत्काळ त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

महाड मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार हे सर्व प्रक्रियेवर जातीने लक्ष देत होते. मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सुविधा, दिव्यांग व्यक्तींसाठी व्हीलचेअर आणि मदतनीस पुरवण्यात आला होता. यामुळे दिव्यांग मतदारही मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले होते. सकाळी ९ वाजेपर्यंत केवळ ८.६ टक्के, ११ वाजता १७.५ टक्के, तर दुपारी १ वाजेपर्यंत ३०.२८ टक्के मतदान झाले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत या ठिकाणी फक्त ४५.४६ टक्के तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७.९४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

पनवेल 56% मतदान

पनवेल : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पनवेल विधानसभा मतदारसंघात सोमवारी मतदान शांततेत पार पडले. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. सायंकाळी ६ पर्यंत मतदारसंघात ५६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
तळोजा या ठिकाणी मतदान केंद्र क्रमांक ३५ या ठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने मशिन बंद पडली. १५ मिनिटांत नवी मशिन या केंद्रात बसविण्यात आली. या वेळी मतदारांना केंद्रावर ताटकळत उभे राहावे लागले.

उरण 73% मतदान

उरण : ३२७ मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केल्याने उत्साहाचे वातावरण होते. ६ वाजेपर्यंत ७३ टक्के मतदान झाले.
उरणमधील ग्रामीण व शहरी मतदान केंद्रावर दिवसभर गर्दी होती. मतदानासाठी सरकारने सुट्टी जाहीर केली असली तरी बºयाच खासगी कंपन्यांनी कामगारांना सुट्टी जाहीर केली नव्हती. त्यामुळे घाईघाईने मतदान करून कामावर जाणाºया खासगी कंपनीच्या कामगारांची संख्या सर्वाधिक होती. ७ ते ९ आणि १० ते १२ वाजेपर्यंत विविध मतदान केंद्रांवर मोठी गर्दी होती. कें द्रावर चोख बंदोबस्त होता.

अलिबाग 69% मतदान

अलिबाग : अलिबाग विधानसभा मतदारसंघात सुमारे ६९ टक्के मतदान झाले. सोमवारी सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी उत्साह दाखवला. मतदारांमध्ये उत्साह वाढवा यासाठी पाच सखी केंद्र, आदर्श केंद्र आणि दिव्यांग केंद्र उभारण्यात आले होते. तसेच सेफ्ली पॉइंटही उभारण्यात आले होते, त्यामुळे मतदान केंद्रावर नवमतदारांसह ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह दिसून आला.

सायंकाळी ५ वाजेपर्यंत अलिबाग विधानसभा मतदारसंघात ६६.२८ टक्के मतदान झाले होते. अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे विभागात शिवसेना आणि शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. रुग्णालयातील रुग्णालयातील रुग्णांना मतदान करता.

नऊ केंद्रावरील व्हीव्हीपॅट युनिट मशिन्स बंद

उरण मतदारसंघातील नऊ मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट युनिट मशिन्स बंद पडल्या होत्या. यामुळे १५ मिनिटे मतदारांचा खोळंबा झाला.
च्मात्र, पर्यायी व्हीव्हीपॅट युनिट मशिन्सची व्यवस्था करण्यात आली असल्याने अडथळाविना मतदान सुरळीत सुरू झाल्याची माहिती उरण विधानसभा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी पाटील यांनी दिली.

Web Title: Maharashtra Election 2019: Voting fell sharply; Locked in the futuristic machine of the 78 candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.