रायगड जिल्ह्यात पाच मतदारसंघात युतीविरोधात आघाडीची लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 02:55 AM2019-10-05T02:55:25+5:302019-10-05T02:55:48+5:30

रायगड जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीविरोधात युती अशीच लढत सध्या पाहायला मिळत आहे

Maharashtra Election 2019 : Mahayuti against Aaghadi in five constituencies in Raigad district | रायगड जिल्ह्यात पाच मतदारसंघात युतीविरोधात आघाडीची लढत

रायगड जिल्ह्यात पाच मतदारसंघात युतीविरोधात आघाडीची लढत

Next

- आविष्कार देसाई

अलिबाग : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीविरोधात युती अशीच लढत सध्या पाहायला मिळत आहे; परंतु उरण मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार मनोहर भोईर यांच्याविरोधात भाजपचे महेश बालदी यांनी बंडखोरी केली आहे. त्याला प्रतिउत्तर देताना शिवसेचे बबन पाटील यांनी पनवेल मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करून शड्डू ठोकला आहे. महेश बालदी हे माघार घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याचे दिसत असल्याने पनवेलमध्ये शिवसेना नेमकी कोणती भूमिका घेणार हे ७ आॅक्टोबरला अर्ज मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

सात विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने उरण, पनवेल, श्रीवर्धन आणि पेण मतदारसंघातील लढती लक्षवेधी ठरणार आहेत. उरणमध्ये शिवसेनेच मनोहर भोईर, शेकापचे माजी आमदार विवेक पाटील आणि भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी तसेच पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर यांच्याविरोधात शेकापचे हरेश केणी आणि शिवसेनेचे बबन पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महेश बालदी आणि बबन पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यास लढतीचे चित्र शेकापविरोधात भाजप असेच दिसू शकते.

श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे या प्रथमच आपले नशिब आजमावत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेने विनोद घोसाळकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे येथीही युती विरोधात आघाडी असेच चित्र दिसणार आहे. अदिती या खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या असल्याने मुलीला निवडून आणण्यासाठी सुनील तटकरे जीवाचे रान करतील यात काहीच शंका असण्याचे कारण नाही. शिवाय २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार सुनील तटकरे यांना श्रीवर्धन मतदारसंघाने सुमारे ३१ हजारांचे मताधिक्य दिले होते.

याच मतदारसंघातून अदिती यांचे चुलत भाऊ अवधूत तटकरे लढणार असे बोलले जात होते. मात्र, त्यांचे नाव मागे पडून थेट विनोद घोसळकर यांनाच शिवसेनेने अधिकृत उमेदवारी दिली.

पेण मतदारसंघामध्ये शेकापचे धैर्यशील पाटील हे हॅट्ट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत. त्यांची लढत काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री रवींद्र पाटील यांच्याशी होणार आहे. उरणमध्ये भाजपने बंडखोरी केल्याने शिवसेनेनेही नरेश गावंड यांना पेणमध्ये उतरवण्याती तयारी केली होती. मात्र, वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशाचे पालन करून या मतदारसंघाला बंडखोरीच ग्रहण लागले नाही. रवींद्र पाटील यांचा सामना धैर्यशील पाटील यांच्याबरोबर आधी झाला आहे. धैर्यशील पाटील यांनी त्यांना आस्मान दाखवले होते. आताही प्रतिस्पर्धी तेच आहेत, त्यामुळे पराभवाचे उट्टे काढण्यासाठी पाटील हे मैदानात उतरल्याचे दिसून येते.

महाडमध्ये शिवसेना-काँगे्रस सामना रंगणार

महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले हेही हॅट्ट्रिक करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचा सामना हा काँग्रेसचे माणिक जगताप यांच्याबरोबर आहे. मागील निवडणुकीत गोगावले यांनी जगताप यांना चारीमुंड्या चित केले होते, त्यामुळे जिव्हारी लागलेल्या परभवाची परतफेड करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.

कर्जतमध्येही तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड ताकद लावणार असे दिसत असताना त्यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले होते. नाट्यमयरीत्या उमेदवारीची माळ पुन्हा लाड यांच्याच गळ्यात पडली आहे. शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांच्याशी त्यांचे दोन हात होणार आहेत.

अलिबाग विधानसभा मतदारसंघात शेकापचे सुभाष पाटील यांचा सामना शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्याशी होणार आहे. मागील निवडणुकीत दळवी यांना पाटील यांनी विजयश्रीपासून रोखले होते. तेही या वेळी तयारीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

नाराजीचा फटका बसण्याची शक्यता

जिल्ह्यात काँग्रेसची म्हणावी तशी ताकद असल्याचे दिसून येत नाही. मागील विविध निवडणुकींचा आलेख बघता तो घसरलेलाच असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
शिवसेना-भाजप यांची युती होणार नसल्याचे गृहित धरून दोन्हीकडील उमेदवार हे निवडणूक लढण्याच्या तयारीत होते, त्यांनी तयारीही केली होती; परंतु आता युती झाल्याने त्यांची स्वप्न भंगली आहेत.
त्यामुळे नाराज असलले एकमेकांना किती मदत करतील याबाबतही सांशकतेचे वातावरण आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 : Mahayuti against Aaghadi in five constituencies in Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.