Mahad Building Collapse: चार तासांत १०० तरुणांचे रक्तदान; दुर्घटनेनंतर प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 23:49 IST2020-08-25T23:49:29+5:302020-08-25T23:49:43+5:30
माणगाव, पेण, तळा, पोलादपूर, पनवेल, रोहा, अलिबाग, खोपोली, मुरुड, सुधागड येथून गॅस कटर्स, अॅम्बुलन्स, जनरेटर, जेसीबी, डम्पर, डॉक्टर्स, पोकलेन, पाणी, बिस्किट्स, तसेच मदत कार्यासाठी इतर आवश्यक साधनसामग्री मोठ्या प्रमाणावर तत्काळ पाठविण्यात आली

Mahad Building Collapse: चार तासांत १०० तरुणांचे रक्तदान; दुर्घटनेनंतर प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद
अलिबाग : इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, सामाजिक जबाबदारीच्या कर्तव्य भावनेतून अवघ्या ४ तासांत १०० तरुणांनी रक्तदान केले. अजूनही काही तरुण रक्तदान करण्यासाठी पुढे येत आहेत. एनडीआरएफची पथके रात्री १ वाजून १० मिनिटांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तत्काळ एनडीआरएफच्या पथकांकडून दुर्घटनाग्रस्तांचे शोधकार्य त्वरित सुरू झाले होते. रायगडमधील संपूर्ण आरोग्य यंत्रणेकडून महाड दुर्घटनाग्रस्तांवर उपचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे.
माणगाव, पेण, तळा, पोलादपूर, पनवेल, रोहा, अलिबाग, खोपोली, मुरुड, सुधागड येथून गॅस कटर्स, अॅम्बुलन्स, जनरेटर, जेसीबी, डम्पर, डॉक्टर्स, पोकलेन, पाणी, बिस्किट्स, तसेच मदत कार्यासाठी इतर आवश्यक साधनसामग्री मोठ्या प्रमाणावर तत्काळ पाठविण्यात आली आहे. एनडीआरएफच्या पथकांना घटनास्थळी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी ग्रीन कॉरिडोरची व्यवस्था केली होती, तर मेडिकल कॅम्पसाठी नोडल आॅफिसर म्हणून श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण परिस्थितीवर पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांचे लक्ष आहे.
वृत्तवाहिन्यांवर नजर : सोमवारी सायंकाळी पत्त्याची इमारत जशी कोसळते, तशीच महाड शहरातील काजलपुरा खारखांड मोहल्ला येथील तारिक गार्डन ही इमारत कोसळली. काही क्षणातच होत्याचं सारं नव्हतं झालं होतं. इमारत पडल्याची घटना वाऱ्यासारखी पसरल्यावर सर्व जण सोशल मीडियावरील आधारित बातम्यावर अवलंबून राहिले होते. प्रत्येक जण टीव्हीवरील बातम्या बघून हळहळ व्यक्त करीत होते. महाड येथील घटनेची परिस्थिती जाणून घेण्यासाठी सकाळपासूनच विविध वृत्तवाहिन्या सुरू होत्या.
आरोग्य यंत्रणा सज्ज : जखमींना तत्काळ उपचार मिळण्यासाठी माणगावमधील राऊत हॉस्पिटल, निकम हॉस्पिटल, राठोड, बेडेकर, वक्र तुंड, पटेल, माळी, यादव, रानडे, पाटणकर, चव्हाण, कामेरकर हॉस्पिटल, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रु ग्णालय आणि महाड शहरातील ग्रामीण रु ग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, भोसेकर, नांदगावकर, म्हामुणकर, डॉ.फैजल देशमुख भूलतज्ज्ञ, आर्थोपेडिक, जनरल सर्जन, बालरोगतज्ज्ञ यांच्यासह सज्ज झाले आहेत.