चला, अलिबागच्या प्रसिद्ध ‘पोपटी पार्टी’ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 09:16 AM2023-12-18T09:16:31+5:302023-12-18T09:17:00+5:30

डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या तीन महिन्यांत मात्र एक वेगळंच आकर्षण अनेकांना अलिबागकडे खेचून आणतं, ते म्हणजे अलिबागची सुप्रसिद्ध पोपटी! 

Let's go to Alibaug's famous 'Parrot Party' | चला, अलिबागच्या प्रसिद्ध ‘पोपटी पार्टी’ला

चला, अलिबागच्या प्रसिद्ध ‘पोपटी पार्टी’ला

- तुषार श्रोत्री, खाद्यसंस्कृतीचे अभ्यासक

रायगड जिल्ह्याचं मुख्यालय असलेलं अलिबाग हे तीन बाजूंनी सागरकिनारा लाभलेलं एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून देशभरातल्या पर्यटकांना आकर्षित करतं. अथांग समुद्र, नारळीच्या बागा, काही तुरळक डोंगर, टेकड्या यांनी नटलेलं आणि मुंबईच्या इतकं जवळ असूनही अजून वाडी संस्कृती टिकवून राहिलेलं हे गाव वर्षभर आठवड्याचे सातही दिवस पर्यटकांनी बहरलेलं असतं. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या तीन महिन्यांत मात्र एक वेगळंच आकर्षण अनेकांना अलिबागकडे खेचून आणतं, ते म्हणजे अलिबागची सुप्रसिद्ध पोपटी! 

वालाच्या, तुरीच्या शेंगांसोबत बटाटे, रताळी, आरवीचे कंद, वांगी, टोमॅटो, कांदे, पनीरचे तुकडे, मक्याच्या कणसाचे तुकडे, सिमला मिरचीचे तुकडे, इत्यादी आपल्याला आवडणारे आणि भाजून खायला स्वादिष्ट लागतील असे सर्व प्रकारचे खाद्य जिन्नस या पोपटीसाठी वापरले जातात. गुजराती लोकांचा जसा या मोसमात उंदियो सर्वत्र बनवला आणि हादडला जातो, अगदी तसाच आपल्या रायगडवासीयांचा हा पोपटी. उंदियोमध्ये तेलाचा सढळ हस्ते वापर केला असतो, तर पोपटीमध्ये अभावानेच तेल आढळते, त्यामुळे शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीनेही पोपटी चांगलीच.

थंडीच्या दिवसांत या भागात शेताच्या कडेने उगवणारा भांबुर्डी नावाचा जंगली झुडुपांचा पाला मातीच्या मडक्यात तळाला आणि आतल्या बाजूने लावून त्यात आपल्याला हवे ते जिन्नस मॅरीनेट करून किंवा थोडाफार मसाला लावून, त्यावर चवीसाठी शक्यतो खडे मीठ पेरून त्या मडक्यात ठासून भरले जातात. मडक्यात हवा शिरली तर आतले जिन्नस जळून पोपटी फसत असल्याने हे ठासून भरणं फार महत्त्वाचं असतं. सर्व जिन्नस भरून झाल्यावरही मडक्यात जागा उरली तर त्यात भांबुर्ड्याचा पाला घट्ट दाबून भरावा लागतो. त्यामुळे आपल्या खाण्याच्या क्षमतेनुसारच वापरण्यात येणाऱ्या मडक्याचा आकार ठरवावा. शेतात खड्डा करून त्यात हे पोपटीचं मडकं सर्व बाजूंनी समान जाळ लागेल अशा प्रकारे वाळक्या फांद्या, गवत, पालापाचोळा यांनी वेढून चांगलं अर्धा ते पाऊण तास भाजलं जातं. भाजी किंवा आमटी झाली आहे. आता गॅस बंद करायला हरकत नाही हे जसं घरातल्या बाईला न शिकवताही कळतं, तसंच मडकं जाळाच्या बाहेर काढण्यायोग्य झालं आहे हे तिथल्या जाणकार दर्दी तज्ज्ञ लोकांना पटकन कळतं.

आता खरा पोपटीतल्या कौशल्याचा भाग सुरू होतो तो म्हणजे त्या मडक्यातून आतले जिन्नस अजिबात जळू न देता बाहेर काढणे. यासाठी साधारणतः चिंचा, बोरं काढायला वापरतात तशी पुढे आकडा असलेली लोखंडी शीग वापरतात. आधीच पसरून ठेवलेल्या केळीच्या पानांवर हे मडकं आडवं ठेवलं जातं आणि त्या आकड्याच्या साहाय्याने आतले सर्व जिन्नस एक-दोन झटक्यांत बाहेर काढले जातात. ते जिन्नस आत असताना मडक्यात हवा शिरली तर ते जिन्नस क्षणार्धात जळतात आणि कडू लागतात. ते बाहेर काढताच त्यातील खाद्य पदार्थ भांबुर्ड्याच्या पाल्यापासून वेगळे काढले जातात. माझा अनुभव असा आहे की, बहुतेक वेळा या विलगीकरणाच्या प्रक्रियेदरम्यानच पोपटी चाखायला किंबहुना खायला सुरुवात होते. कारण त्या सर्व मस्त भाजलेल्या पदार्थांमध्ये भांबुर्ड्याचा उतरलेला स्वाद इतका अप्रतिम असतो की, त्यासाठी आणखी काही वेळ थांबणं माझ्यासारख्या खवय्यांसाठी निव्वळ अशक्य असतं. मला खात्री आहे वाचतानाही तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. मंडळी, आमच्या रायगडची पोपटी ही संपूर्ण प्रक्रियाच वाचायची कमी व अनुभवायची आणि मग यथेच्छ हादडायची गोष्ट आहे!            

Web Title: Let's go to Alibaug's famous 'Parrot Party'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.