JNPT's Parking Plaza opens at a cost of Rs 170 crore for centralized parking | जेएनपीटीचे पार्किंग प्लाझा सुरू, सेंट्रलाइज्ड पार्किंगसाठी १७० कोटींचा खर्च

जेएनपीटीचे पार्किंग प्लाझा सुरू, सेंट्रलाइज्ड पार्किंगसाठी १७० कोटींचा खर्च

उरण - जेएनपीटीचा सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा सुरू करण्यात आला आहे. सुमारे ४५ हेक्टर क्षेत्रामध्ये १७० कोटींची गुंतवणूक करून विकसित केलेल्या या पार्किंग प्लाझामध्ये एकाच वेळी १,५३८ ट्रॅक्टर ट्रेलर्स पार्क करण्याची क्षमता आहे. ऑपरेटर निवडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बंदराच्या पायाभूत सुविधा सुधारणेच्या उपक्रमांतर्गत जेएनपीटीने बंदराबाहेर उभारलेला नवीन सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्याही दूर होईल, असा विश्वास व्यक्त जेएनपीटी प्रशासनाने व्यक्त  केला आहे. 

जेएनपीटी बंदरातून दररोज सुमारे १४ हजार कंटेनर मालाची वाहतूक होते. मात्र, आवश्यकतेनुसार ट्रॅक्टर-ट्रेलर्ससाठी पार्किंगची व्यवस्था नाही. बंदराबाहेरच्या रस्त्यांवरच वाहने पार्किंग केली जातात. शिवाय यामुळे वाहतुकदार, आयात-निर्यातदार आणि बंदराचेही आर्थिक नुकसान होते. जेएनपीटी बंदरात आयात-निर्यात व्यवसाय आणखी सुलभ करता यावा, यासाठी आता जेएनपीटीने सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझाची उभारणी केली आहे.

या सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझाचा विकास फॅक्टरी स्टफ्ड निर्यात कंटेनर वाहून नेणारे ट्रॅक्टर ट्रेलर्सच्या एकत्रित पार्किंगसाठी उपयोग होणार आहे. पार्किंग प्लाझामधील अत्याधुनिक सुविधा आणि सेवा तरतुदींमुळे कस्टम विभागाशी संबंधित दस्तऐवज प्रक्रिया एकाच ठिकाणी पूर्ण होणार आहे. या प्लाझामध्ये व्यवस्थापन रिअल टाइम पार्किंग व्यवस्थापन प्रणालीचा वापर, वाय-फायची सुविधा, निर्यात कंटेनरची मुक्त तपासणी व रिफर कंटेनरला वीजपुरवठा करण्याची सोय आहे, तसेच ट्रक चालकांना राहण्यासाठी सोय, कॅन्टीन, वाहन दुरुस्ती, देखभाल या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझामध्ये प्रत्येक प्रवेशद्वार व प्रवेश लेनवर सुरक्षारक्षक व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जे ट्रॅक्टर ट्रेलरना प्रवेशासाठीची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी संबंधित प्रवेशद्वार व प्रवेश लेनवर जाण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत. ज्यामुळे प्रवेशासाठी ट्रॅक्टर ट्रेलरची रांग लागणार नाही वा प्रतीक्षा करावी लागणार नाही, याची दक्षताही सुरक्षा कडून घेतली जात आहे. या पार्किंग प्लाझामध्ये ड्राय, धोकादायक, रीफर या प्रकारातीलही कंटेनर पार्किंग करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझामधील ट्रॅक्टर ट्रेलरना  त्याच्या पार्किंगच्या ठिकाणी व्हेरिएबल मेसेजिंग चिन्हे, इतर चिन्हे वापरून मार्गदर्शन केले जात आहे. एकदा एक्स्पोर्ट ऑर्डर जारी झाल्यानंतरच ट्रॅक्टर ट्रेलर संबंधित एक्झिट गेटमधून पार्किंग प्लाझामधून बाहेर जाऊ शकणार आहेत. यामुळे तस्करी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मदत होणार असल्याचा दावा ही जेएनपीटी बंदर प्रशासनाकडून केला जात आहे.  

एमआयएस प्रणाली 
पार्किंग प्लाझामध्ये एमआयएस प्रणालीही जोडण्यात आली आहे. या प्रणालीमुळे  ड्रायव्हरचे नाव, संपर्क क्रमांक, ट्रॅक्टर ट्रेलरची पार्किंग प्लाझामध्ये येण्याची वेळ, ट्रक क्रमांक, कंटेनर क्रमांक, कंटेनरचा आकार, प्रकार, शिपिंग बिल क्रमांक, सीएचए संपर्क, टर्मिनल यांसारखा ट्रॅक्टर ट्रेलरचा तपशील नोंदविला जाईल. एकदा प्रवेशद्वारांवर डेटा एन्ट्री झाल्यावर ट्रॅक्टरच्या ट्रेलरला डेस्टिनेशन टर्मिनल, कार्गोचा प्रकार, कंटेनरचा आकार इत्यादी वैशिष्ट्यांनुसार पार्किंग क्रमांक देण्यात येत आहेत. ही संग्रहित सर्व माहिती तारीख, वेळ, स्टॅम्पसह पार्किंग नंबर व युनिक आईडीशी जोडली जाते, तसेच मध्यवर्ती सर्व्हरमध्ये संचयित केली जाते.

Web Title: JNPT's Parking Plaza opens at a cost of Rs 170 crore for centralized parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.