कड्यावरची माउली आई जाकमाता देवी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 02:53 AM2019-10-04T02:53:37+5:302019-10-04T02:54:12+5:30

श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध मंदिर व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जाकमाता देवीच्या नवरात्रोत्सवाला रविवारी सकाळी महापूजेने प्रारंभ झाला.

Jakmata Devi temple | कड्यावरची माउली आई जाकमाता देवी

कड्यावरची माउली आई जाकमाता देवी

googlenewsNext

- गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध मंदिर व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जाकमाता देवीच्या नवरात्रोत्सवाला रविवारी सकाळी महापूजेने प्रारंभ झाला. मंदिरात पहिल्याच दिवशी हजारो भाविक आदिमायेच्या चरणी नतमस्तक झाले. या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत असून, नवरात्र महोत्सवानिमित्त रविवारपासून परिसरातील मंदिरात व सार्वजनिक मंडळातून कीर्तन, प्रवचन, भजन आदी उपक्रम सुरू झाले आहेत.

श्रीवर्धनपासून अगदी १५ किलोमीटरच्या अंतरावर बोर्ली पंचतन शहरानजीक असलेल्या श्री जाखमाता देवीच्या मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भक्तांची रांग दिसते. शिस्ते, कापोली, खारशेत भावे या तीन गावांची ग्रामदेवता जाकमाता देवीचे मंदिर हे उंच कड्यावर वसलेले आहे. नवरात्रोत्सव निमित्ताने पर्यटक व तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी पायी जातात, त्या वेळेस रस्ता अवघड व घनदाट होता. मात्र, सध्या तिन्ही गावांनी लोकवर्गणीतून दीड किलोमीटरचा रस्ता चांगल्या दर्जाचा केलेला आहे.

त्यामुळे आता आबालवृद्धांनाही मातेच्या दर्शनासाठी जाणे सोयीचे झाले आहे. ज्या डोंगरावर देवीचे मंदिर आहे तो खूप प्राचीन असून मोरपीस किल्ला म्हणून त्याची ओळख आहे. कडा जरी अवघड असला तरी भाविक अगदी श्रद्धेने देवीच्या दर्शनाला पायी जातात. विशेष म्हणजे, या मंदिरात दरवर्षी आश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजया दशमी असे नऊ दिवस मोठ्या भक्तिभावाने शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो.

कड्यावर पुरातन हौद आणि वाघाची गुहा पाहण्यासारखी आहे. प्रतिवर्षी २६ डिसेंबरला माउलीचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी असते. विशेष म्हणजे, उंच कड्यावर बारमाही पाणी असते, हे येथील वैशिष्ट्य आहे.

जाकमातेचा कडा
देवीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या भोवताली सुंदर निसर्ग पाहायला मिळतो. डोंगरावर वसलेले देवीचे मंदिर व त्याभोवती डोंगराचा कडा त्यामुळे ‘कड्यावरची देवी’ अशी या मंदिराची ओळख आहे. मंदिरात जाण्यासाठी आता नव्याने पायऱ्यांचे काम केले आहे. तिन्ही गावांकडून दिवसरात्र श्रद्धापूर्वक मंदिरामध्ये नवरात्रीचे नऊ दिवस जागरण केले जाते.

Web Title: Jakmata Devi temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.