सागरी चाचांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे फळांच्या निर्यातीसह दरांवर परिणाम; व्यापारी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 01:04 PM2024-03-18T13:04:20+5:302024-03-18T13:04:43+5:30

बंदरातील आयात-निर्यात व्यापार ३० टक्क्यांपर्यंत घसरला

Increased piracy attacks impact prices, including fruit exports; Traders worried | सागरी चाचांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे फळांच्या निर्यातीसह दरांवर परिणाम; व्यापारी चिंतेत

सागरी चाचांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे फळांच्या निर्यातीसह दरांवर परिणाम; व्यापारी चिंतेत

मधुकर ठाकूर, लोकमत न्यूज नेटवर्क, उरण: सागरी चाचांच्या हल्ल्यांमुळे  ऐन रमजानच्या सणातच भारतीय विविध बंदरातून होणाऱ्या फळांच्या निर्यातीला अडचणी निर्माण झाल्या आहेत. युरोप, आशिया आणि आफ्रिका खंडाशी जोडणारा आणि मालवाहू जहाजांसाठी कमी अंतराचा असलेल्या तांबडा समुद्राला (रेड सी) मोठा वळसा घालून मालवाहू जहाजांना प्रवास करावा लागत असल्याने जहाजांच्या सर्व प्रकारच्या मालवाहतूक भाडेदरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे सागरी मार्गावरील होणाऱ्या मालाच्या आयात-निर्यातीचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत घटले असल्याने व्यापाऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आशिया, आफ्रिका, युरोप खंडाशी जोडणारा आणि मालवाहू जहाजांसाठी कमी अंतराच्या तांबड्या समुद्रातून विविध देशांतील रोज शेकडो मालवाहू जहाजे विविध प्रकारच्या मालाची वाहतूक करतात. मालवाहू जहाजांसाठी तांबडा समुद्र आयात-निर्यातीसाठी कमी अंतरामुळे अत्यंत उपयुक्त आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो; मात्र या समुद्रातील जहाजांवर झालेल्या सागरी चाचांच्या  हल्ल्यांमुळे जहाज वाहतूक पुरती कोलमडली असून ठप्प झाली आहे. याचा विपरीत परिणाम या सागरी मार्गावरुन होणाऱ्या आयात-निर्यात करणाऱ्या मालवाहू जहाजांवर झाला आहे. 

धोका टाळण्यासाठी तांबड्या समुद्रातील प्रवास टाळून मालवाहू जहाजांना अन्य सागरी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. इच्छित बंदरापर्यंत माल पोहोचविण्यासाठी २० ते ३० दिवसांपर्यंत विलंब होत आहे. वेळ, खर्च वाढला असल्यामुळे कंपन्यांनी जहाजांच्या मालवाहतूक भाडेदरांमध्ये वाढ केली आहे.

मालवाहू जहाजांच्या भाडेदरांमध्ये केलेली दरवाढ नाईलाजाने करावी लागली असल्याचे शिपिंग कंपन्यांकडून सांगितले जात आहे; मात्र मालवाहू करणाऱ्या जहाजांच्या मालवाहतूक भाडेदरात वाढ झाल्याने विविध बंदरातील आयात-निर्यात व्यापार ३० टक्क्यांपर्यंत घटला आहे.
-राहुल पवार, मालक, स्वान ओव्हरहेड एक्सपोर्ट-इंपोर्ट कंपनी

रमजानमध्ये भारतीय बंदरांतून युरोप, अमेरिकेमध्ये विशेषतः महाराष्ट्रातून द्राक्षे, डाळिंब, सफरचंद, आंबा आणि इतर विविध प्रकारची फळे मोठ्या प्रमाणावर निर्यात होतात, मात्र या फळांच्या निर्यातीला अडचणी निर्माण झाल्या आहेत. जहाजांच्या मालवाहतूक भाडेदरांत काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आयात-निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
-इरफान मेनन, मालक बच्चूभाई ॲण्ड कंपनी

फळांचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

अनेक निर्यातदार कंपन्यांनी आखाती देशांमध्ये वेळेवर फळे पोहोचविण्यासाठी विमान कंपन्यांकडे धाव घेतली आहे; मात्र मुबलक कार्गो स्लॉट उपलब्ध होत नसल्याने विमान कंपन्यांनीही दुपटीने दरवाढ केली असल्याचेही निर्यातदारांकडून सांगितले जात आहे. जहाजांना मार्ग बदलावा लागल्याने वाहतूक २० ते ३० दिवसांनी वाढली आहे. शेतीमाल वेळेत दाखल होत नसल्याने निर्यातदारांचे नुकसान होत आहे. तर निर्यातदारांनी फळांची खरेदीच कमी केल्याने निर्यात होणाऱ्या फळांचे दरही कमी होत चालले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. 

Web Title: Increased piracy attacks impact prices, including fruit exports; Traders worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :uran-acउरण