दिल्ली स्फोटानंतर सागरी सुरक्षा वाढवण्यावर भर; पोलीस मच्छिमारांशी साधणार संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:37 IST2025-11-12T15:36:27+5:302025-11-12T15:37:10+5:30
दहशतवाद्यांचे मनसूबे उधळून लावण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

दिल्ली स्फोटानंतर सागरी सुरक्षा वाढवण्यावर भर; पोलीस मच्छिमारांशी साधणार संवाद
निखिल म्हात्रे
अलिबाग - दिल्ली स्फोट प्रकरणानंतर रायगड जिल्ह्याची सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्यावर जिल्हा पोलीस दलाने भर दिला आहे. समुद्र किनाऱ्यांबरोबरच फाऊस्टार हॉटेलसुद्धा सुरक्षा दृष्टीने महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे या ठिकाणची सुरक्षा तपासून समुद्र किनाऱ्यांवरील १ हजाराहून अधिक कॉटेजेस आणि हॉटेल्सची तपासणी करण्यात आली आहे. तसेच किनाऱ्यांवर सर्चिंग ऑपरेशन सुरु आहे.
दहशतवाद्यांचे मनसूबे उधळून लावण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. पेण, अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यांमधील कोस्टल आणि लँडींग भागात शस्त्रधारी नाकाबंदी करण्यात आली आहे. काही ठिकाणी स्पेशल ऑल आऊट ऑपरेशन देखील राबविण्यात आले आहेत.
मच्छीमारांसोबत संवाद साधून त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सागर सुरक्षा दल, ग्राम सुरक्षा दल आणि पोलीस पाटील यांच्या बैठकीद्वारे जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा समजला जाणारा ताज हॉटेल येणाऱ्यांची माहिती नोंदवून ठेवण्यात येत आहे. समुद्र किनाऱ्यांवर पोलीसांची सतत गस्त सुरू आहे.
सायबर सेलची नजर
सोशल मीडियावर अफवा पसरवण्याचा प्रकार काही संघटनांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोशल मीडिया सेल सक्रिय आहे. सायबर सेल प्रत्येकाच्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहे आणि ही यंत्रणा २४ तास सुरू राहणार आहे.
सागरी किनाऱ्यांवर लक्ष
रायगड जिल्ह्यातील सागरी सुरक्षा मजबूत ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सतत काम करत आहे. जे कर्मचारी दीर्घकालीन सुट्टीवर आहेत, त्यांना पुन्हा बोलावण्यात आले आहे. पोलीस दलाकडे चार बोटी असून मच्छीमारांच्या बोटींच्या साहाय्याने सागरी किनाऱ्यांवरील संशयित हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे. किनाऱ्यांवर दररोज पायी पेट्रोलिंग केल्या जात असून, मुंबईहून मांडवा येथे बोटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची देखील तपासणी होत आहे. महत्वाच्या ठिकाणी पोलीसांची २४ तास गस्ती सुरू आहे. - आँचल दलाल, जिल्हा पोलीस अधीक्षक.