रायगड जिल्ह्यात पुढील तीन तास मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 13:50 IST2020-07-07T13:49:44+5:302020-07-07T13:50:40+5:30
सकाळपासून पावसाचा जाेर वाढला

रायगड जिल्ह्यात पुढील तीन तास मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा
रायगड: जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पुढील तीन तास मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. सकाळपासूनच पावसाने जिल्ह्यात जाेरदार हजेरी लावली आहे. साेसाट्यांच्या वाऱ्यासह पाऊस बरसत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. सलग पडणाऱ्या या पावसामुळे कुंडलीका, आंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे.
गेल्या दाेन दिवसांपासबन मुसळधार पावसाबरोबर साेसाट्यांचे वारे वाहत असल्याने रायगडकरांना निसर्ग वादळाची आठवण हाेत आहे.मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने मंगळवारी (7 जुलै) राेजी दुपारी साडेबारा वाजता दिलेल्या इशान्यानुसार, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन तास मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार पावसाचा जाेर वाढला आहे. सलग पडणारा पाऊस आणि समुद्राला येणाऱ्या उधाणामुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या सखल भागांमध्ये पाणी साठत आहे.