‘बावळे’तील भेगांची भूवैज्ञानिकांकडून पाहणी; लोकांनी घाबरू नये, प्रशासनाचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 06:10 AM2022-07-06T06:10:16+5:302022-07-06T06:10:30+5:30

प्राथमिक तपासाअंती कोणताही धोका नसल्याची माहिती

Geologists survey the cracks in Bavale; People should not be afraid, appeals the administration | ‘बावळे’तील भेगांची भूवैज्ञानिकांकडून पाहणी; लोकांनी घाबरू नये, प्रशासनाचं आवाहन

‘बावळे’तील भेगांची भूवैज्ञानिकांकडून पाहणी; लोकांनी घाबरू नये, प्रशासनाचं आवाहन

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात बावळे गावातील परिसरात डोंगर जमिनीला भेगा पडल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार वरिष्ठ भूवैज्ञानिक हनुमंत संगनोर, वरिष्ठ भूवैज्ञानिक तथा जिल्हा खनिकर्म अधिकारी राजेश मेश्राम यांच्यासह प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशीद यांनी या गावाला भेट देऊन तेथील जमिनीला पडलेल्या भेगांची तातडीने पाहणी केली. प्राथमिक तपासणीनुसार पाण्यामुळे भेग पडली असून कोणताही धोका नसल्याची माहिती दिली आहे.

महाड तालुक्यातील बावळे या गाव परिसरातील जमिनीला दोन दिवसांपूर्वी मोठी भेग पडली होती. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तलीयेसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने भूवैज्ञानिक पथकाला पाठवून पाहणी करण्यास सांगितले. त्यानुसार पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. जमिनीला पडलेली ही भेग उत्तर-दक्षिण असून त्याची लांबी सुमारे १५ ते २० मीटर एवढी आहे. या भेगेची खोली दीड ते दोन फूट असून त्यात पाणी साठलेले आहे. या बाबींवरून ही भेग मातीमध्ये पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे पडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.

भेगांची दररोज केली जाणार पाहणी
प्राथमिक पाहणी दरम्यान या भेगांमुळे कोणताही धोका संभवत नसून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून या भेगेची दररोज दोन ते तीनवेळा पाहणी करून काही बदल असल्यास स्थानिक प्रशासनास त्वरित कळविण्याबाबत संबंधित सरपंच व गावकऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Web Title: Geologists survey the cracks in Bavale; People should not be afraid, appeals the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.