थंडावा देणाऱ्या फळांमुळे फुटला घाम

By निखिल म्हात्रे | Published: March 13, 2024 06:08 PM2024-03-13T18:08:47+5:302024-03-13T18:10:07+5:30

कलिंगड, लिंबू सरबत, उसाचा रस आणि काकडी हे उष्मा घालवण्यासाठी सर्वांसाठी सर्वांत सोपा व स्वस्त पर्याय आहे; परंतु जिल्ह्यासह राज्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे कलिंगड, लिंबू आणि काकडीचे नुकसान झाले आहे.

fruits rate increase in alibag | थंडावा देणाऱ्या फळांमुळे फुटला घाम

थंडावा देणाऱ्या फळांमुळे फुटला घाम

अलिबाग - उन्हाची काहिली वाढत आहे. त्यामुळे शरीराला थंडावा देणाऱ्या कलिंगड, लिंबू, ऊस आणि काकडीला मागणी वाढत आहे. परंतु अवकाळी पावसामुळे याचे उत्पादन घटले असून दर्जाही खालावला आहे. त्यामुळे या फळांचे भाव वाढल्याने सर्वांना घाम फुटला आहे. रायगड जिल्ह्यातील स्थानिक कलिंगडाचा गोडवा सुद्धा कमी झाला आहे.

कलिंगड, लिंबू सरबत, उसाचा रस आणि काकडी हे उष्मा घालवण्यासाठी सर्वांसाठी सर्वांत सोपा व स्वस्त पर्याय आहे; परंतु जिल्ह्यासह राज्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे कलिंगड, लिंबू आणि काकडीचे नुकसान झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी २० ते २५ टक्क्यांनी भाव वाढले आहेत. अवकाळी पावसामुळे रायगडच्या कलिंगडाची गोडी उडाली आहे. त्यामुळे नाशिक व इतर ठिकाणांवरील कलिंगड जिल्ह्यात विक्रीसाठी येत आहेत. लिंबाचीही आवक घटल्याने त्यांचेही भाव वधारले आहेत. लिंबाला तर संत्री आणि मोसंबी इतका भाव आहे. त्यामुळे लिंबू सरबतही महागले आहे. कोकम व काकडीचे भावही वधारले असून एका मोठ्या काकडीमागे पाच ते १० रुपये मोजावे लागत आहे. यावर्षी कलिंगडामध्ये २० ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे. उसाचे दरही शेकड्यामागे १०० रुपयांनी वाढले आहेत. परिणामी, अनेक जण कृत्रिम पर्याय निवडत आहेत. त्यामध्ये बंद बाटलीतील सरबते आणि प्लास्टिकच्या पाऊचमध्ये मिळणाऱ्या सरबतना मागणी वाढत आहे.

पावसाने या वर्षी जिल्ह्यातील कलिंगडाची गोडी हरवली आहे. उत्पादन घटले असून, कलिंगडाचा आकारही प्रमाणात नाही. बहुतेक सर्व माल खराब निघत आहे. भाव मिळत नसल्याने नुकसान होत आहे. परिणामी, नाशिक येथून शुगरकेन जातीचे कलिंगड विक्रीसाठी आणत आहे.
- निकेत मढवी, कलिंगड विक्रेता.

उन्हाळ्यात लिंबाची मागणी वाढली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आवक कमी असल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात लिंबाचे भाव वाढले आहेत. मात्र, ग्राहक कमी किमतीत मागणी करतात हे परवडत नाही.
- इंद्रजीत गुप्ता, भाजी विक्रेता.

Web Title: fruits rate increase in alibag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.