भरधाव टोइंग व्हॅनच्या धडकेत चार ठार, महाडमधील दुर्घटना; दोघांची प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 06:25 IST2025-01-04T06:23:25+5:302025-01-04T06:25:37+5:30
अपघाताची नोंद महाड तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी टोइंग व्हॅन चालक सुयोग्य सहस्रबुद्धे (२९, रा. चिपळूण) याच्यावर गुन्हा दाखल करीत चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

भरधाव टोइंग व्हॅनच्या धडकेत चार ठार, महाडमधील दुर्घटना; दोघांची प्रकृती चिंताजनक
महाड : महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्टेशनजवळ उभ्या असलेल्या एका कारला भरधाव टोइंग व्हॅनने दिलेल्या धडकेत चार जण ठार, तर दोन जण जबर जखमी झाले. मृतांमधील सर्वजण महाड शहरातील राहणारे आहेत. गुरुवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली.
यासंदर्भातील सविस्तर वृत्त असे की, सूर्यकांत मोरे (रा. नवेनगर), साहिल शेलार, प्रसाद नातेकर (दोघेही रा. कुंभार आळी), समीप मिंडे (रा. दासगाव), सूरज नलावडे (रा. चांभार खिंड) आणि शुभम मातळ हे सहा जण गुरुवारी मध्यरात्री मुंबई-गोवा महामार्गावरून माणगावच्या दिशेने जात होते. वीर रेल्वे स्थानकानजीक त्यांच्या वाहनातील डिझेल संपले. गाडी रस्त्यालगत उभी करून हे सहाही जण गाडीजवळच उभे होते. तेवढ्यात भरधाव वेगाने आलेल्या टोइंग व्हॅनने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होते की, त्यात सर्वजण दहा फूट अंतरापर्यंत फरफटत गेले. तर गाडी ५० फूट लांब फेकली गेली. अपघातात सूर्यकांत मोरे आणि साहिल शेलार यांचा जागीच मृत्यू झाला.
व्हॅनचालकाला अटक
अपघाताची नोंद महाड तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी टोइंग व्हॅन चालक सुयोग्य सहस्रबुद्धे (२९, रा. चिपळूण) याच्यावर गुन्हा दाखल करीत चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू
- अपघाताचे वृत्त समजताच महामार्ग वाहतूक पोलिस आणि महाड तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी चार जणांना महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले.
- मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नवी मुंबई, मुंबईत हलवण्यात आले. माणगाव येथे आले असता प्रसाद नातेकर यांचा मृत्यू झाला.
- तर समीप मिंडे यांचा कळंबोली एमजीएम रुग्णालयात मृत्यू झाला. सूरज नलावडे आणि शुभम मातळ हे जबर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे.