अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षावर वनविभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 10:02 IST2025-10-25T10:02:19+5:302025-10-25T10:02:19+5:30
वन विभागातर्फे जयेंद्र भगत यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षावर वनविभागाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : संरक्षित वन्य प्राणी असलेल्या भेकराचे मांस घरात ठेवल्याबद्दल अलिबाग राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष आणि वाडगावचे उपसरपंच जयेंद्र भगत यांच्यावर अलिबाग पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी मुद्देमाल वन विभागाकडे देण्यात आलेला आहे. वन विभागातर्फे जयेंद्र भगत यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वाडगाव येथील उपसरपंच जयेंद्र भगत यांनी फणसाड अभयारण्यात शिकार करून भेकर जातीच्या संरक्षित वन्य जीव प्राण्याचे मांस घरात ठेवले असल्याची माहिती अलिबाग पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी प्रभारी पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी पथकासह भगत यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी फ्रिजमध्ये भेकराचे एक किलो मांस आढळले.
सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एन. मुसळे यांनी दोन पंचासमक्ष सर्व मुद्देमाल जप्त केला आणि पुढील कारवाईसाठी वन विभाग वन परिक्षेत्र अधिकारी अलिबाग यांच्या ताब्यात दिला. जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलिस अधीक्षक अभिजित शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, मुसळे, प्रदीप देशमुख, जितेंद्र चवरकर, गणेश पारधी, सागर गोळे यांनी ही कारवाई केली.
भेकराची शिकार कोणी केली याचा तपास करणार
अलिबाग वनविभागाचे नरेंद्र पाटील हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी जयेंद्र भगत याना ताब्यात घेतले. भेकराची शिकार करताना कोण सोबत होते, हत्यार कोणते वापरले, मांस कोणा कोणाला दिले यांचा तपास सुरू आहे. त्यामुळे वन विभागाकडून याबाबत गुन्हा दाखल करण्यात येणार असून पुढील तपास करण्यात येणार आहे.