घरात घुसून कुटुंबावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा, पिस्तुलासह रॉडने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 10:13 IST2025-10-12T10:13:16+5:302025-10-12T10:13:33+5:30
कर्जत : धाकटे वेणगाव येथे पहाटेच्या सुमारास झोपलेल्या कुटुंबावर धारदार शस्त्रे, पिस्तूल आणि रॉडने हल्ला करीत कुटुंबातील चार जणांना ...

घरात घुसून कुटुंबावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा, पिस्तुलासह रॉडने हल्ला
कर्जत : धाकटे वेणगाव येथे पहाटेच्या सुमारास झोपलेल्या कुटुंबावर धारदार शस्त्रे, पिस्तूल आणि रॉडने हल्ला करीत कुटुंबातील चार जणांना गंभीर जखमी करणाऱ्या तिघांविरोधात कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, तर दोघे फरार आहेत. या हल्ल्यात पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. इतकेच नव्हे, तर या आरोपींनी परिसरातील रिक्षांच्या काचाही फोडल्या.
धाकटे वेणगावमधील प्रतीक ऊर्फ छोटू भुरूलाल शिंदे (वय २८) याच्या घरात घुसून किरण नितीन शिंदे, मंगेश बाळू जाधव आणि जय सुनील साबळे यांच्यासह आणखी दोघे अशा पाच जणांनी शिंदे कुटुंबीयांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. पहाटे शिंदे यांच्या घराचा दरवाजा तोडून आरोपी आत शिरले. शिंदे कुटुंब गाढ झोपेत होते. आरोपींनी पिस्तूल, कोयता, चॉपर आणि लोखंडी रॉड घेऊन हल्ला चढवला. यात प्रतीक, त्यांचे आई-वडील आणि भाऊ असे चौघे गंभीर जखमी झाले.
फॉरेन्सिक लॅबची टीम घटनास्थळी
नागरिकांनी या घटनेची पोलिसांना माहिती दिली. कर्जत उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड तसेच कर्जत पोलिस ठाण्याचे अधिकारी संदीप भोसले आणि महिला अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक मनीषा लटपटे हे सर्व तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी संपूर्ण घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अलिबाग फॉरेन्सिक लॅबची टीमही तपासासाठी घटनास्थळी दाखल झाली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा हल्ला जिवे ठार मारण्याच्या हेतूनेच झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली.
हल्लेखोर शिंदे यांच्या भावकीतीलच असल्याचे समजते. या घटनेमागे कौटुंबिक मतभेद आणि जागा-जमिनीचा वाद असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शोधमोहीम सुरू
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी पहाटेच कट रचून कर्जत दहिवली येथे एकत्र येत धाकटे वेणगाव येथे हल्ला करण्याची योजना आखली. पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू केली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांना ठाणे आणि पनवेल येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.