पावसामुळे आंबा हंगाम महिनाभर लांबणीवर, अद्याप मोहोरही नाही, शेतकरी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 01:25 AM2019-11-30T01:25:45+5:302019-11-30T01:26:13+5:30

राज्यातील शेतकरी ओल्या दुष्काळामुळे त्रस्त झाले आहेत. लांबलेल्या पावसाचा फटका कांदा व इतर पिकांप्रमाणे कोकणातील हापूस आंब्यालाही बसला आहे.

Due to the rain mango season being prolonged, Farmers worry | पावसामुळे आंबा हंगाम महिनाभर लांबणीवर, अद्याप मोहोरही नाही, शेतकरी चिंतेत

पावसामुळे आंबा हंगाम महिनाभर लांबणीवर, अद्याप मोहोरही नाही, शेतकरी चिंतेत

googlenewsNext

- नामदेव मोरे
नवी मुंबई : राज्यातील शेतकरी ओल्या दुष्काळामुळे त्रस्त झाले आहेत. लांबलेल्या पावसाचा फटका कांदा व इतर पिकांप्रमाणे कोकणातील हापूस आंब्यालाही बसला आहे. नोव्हेंबर संपला तरी अद्याप मोहोर न आल्याने शेतकरी चिंतेत आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मोहर येण्यास सुरुवात होईल व एप्रिलमध्येच मार्केटमध्ये मुबलक आंबा उपलब्ध होईल, असा अंदाज शेतकऱ्यांसह व्यापा-यांनी व्यक्त केला आहे.

देशातील सर्वाधिक आंबा उत्पादन भारतामध्ये होते व देशातील सर्वाधिक महाराष्ट्रात.कोकणातील हापूसला देशाच्या विविध भागासह विदेशातही चांगली मागणी आहे. फक्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी ७०० ते ८०० कोटी रुपयांची उलाढाल या व्यवसायामध्ये होत आहे. मुंबईत कोकणसह कर्नाटक व इतर ठिकाणावरूनही आंबा विक्रीसाठी येत असतो. मागील काही वर्षांत आंब्याची निर्यातही चांगली होऊ लागली आहे. गतवर्षी ४६,५१० टन आंब्याची निर्यात होऊन तब्बल ४०६ कोटी रुपयांची उलाढाल झाली.

एक लाख पाच हजार टन आमरसाची निर्यात झाली असून, त्यामधून ६५७ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. गतवर्षी आंबा हंगाम उत्तम झाला होता; परंतु या वर्षी मात्र पावसामुळे पीक किती येणार या विषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. प्रत्येक वर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला कोकणात आंब्याला मोहोर येण्यास सुरुवात होते. या वर्षी नोव्हेंबर संपत आला तरी मोहर आलेला नाही. डिसेंबरच्या दुस-या आठवड्यामध्ये मोहोर येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पावसाळा लांबल्यामुळे ही स्थिती निर्माण झालेली आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडमध्येही आंब्याला मोहोर आलेला नाही. यापूर्वी हवामानाचा फटका एक वेळी एखाद्या जिल्ह्यास बसायचा; परंतु या वर्षी आंबा उत्पादन होणाºया संपूर्ण पट्ट्यात कुठेच मोहोर आलेला नाही. जानेवारी अखेरपासून मुंबईत आंब्याची थोडी आवक सुरू होते. मार्चमध्ये सर्वसामान्य नागरिकांना परवडेल, अशा दरामध्ये आंबा उपलब्ध होतो; पण या वर्षी मार्चअखेरीस आंबा येण्यास सुरुवात होईल व सर्वसामान्यांना एप्रिलपर्यंत वाट पाहवी लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मोहोर किती येणार यावर हंगाम कसा होईल ते सांगता येईल, अशी माहितीही व्यापाºयांनी दिली आहे.

पावसाचा कालावधी लांबल्याचा फटका आंबा हंगामावरही होणार आहे. अद्याप कोकणात आंब्याला मोहोरही आलेला नाही. यामुळे एक महिना हंगाम उशिरा सुरू होणार आहे.
- संजय पानसरे,
व्यापारी प्रतिनिधी,
एपीएमसी

रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये कुठेच अद्याप आंब्याला मोहोर आलेला नाही. डिसेंबरच्या दुसºया आठवड्यामध्ये मोहोर येईल, असा अंदाज आहे. या वर्षी मार्च अखेरीस आंबा प्रत्यक्ष मार्केटमध्ये येण्यास सुरुवात होईल. मोहोर कसा येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- सचिन लांजेकर,
शेतकरी, रत्नागिरी

मालवीचा हापूस मार्केटमध्ये
मुंबईमध्ये १२ नोव्हेंबरला मालवी हापूसची पहिली पेटी विक्रीसाठी आली होती. २०११ मध्ये कोकणातील हापूसचे बियाणे मालवीमध्ये नेण्यात आले व तेथे उत्पादन सुरू करण्यात आले आहे.

नोव्हेंबरमध्येच आला होता आंबा
गतवर्षी आंबा हंगाम चांगला झाला होता. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५ नोव्हेंबरलाच हापूसची पहिली पेटी विक्रीसाठी आली होती. १९ जानेवारीपासून नियमित आवक सुरू झाली होती. या वर्षी मात्र नियमित आवक मार्चमध्येच सुरू होईल, असा अंदाज आहे.

Web Title: Due to the rain mango season being prolonged, Farmers worry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.