Due to the chemical waste fish death in Savitri River in Mahad | महाड औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाण्यामुळे नदीतील मासे झाले नाहीसे

महाड औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाण्यामुळे नदीतील मासे झाले नाहीसे

- सिकंदर अनवारे
दासगाव : महाड औद्योगिक क्षेत्र असल्याने महाडमधील नागरिकांचे व्यवसाय असो किंवा नोकरी असो, मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे समजले जात होते. मात्र, याच्या उलटच झाले. सध्याच्या परिस्थतीत या औद्योगिक क्षेत्रामुळे जवळपास दोन ते अडीच हजार शेतकऱ्यांच्या व्यवसायावर गदा आली आहे. अनेक वर्षांपासून सावित्री खाडीमध्ये घातक रसायन मिश्रीत सांडपाणी सोडण्यात येत असल्याने खाडीमध्ये मच्छीमारी हा व्यवसाय कायमचा बंद झाला आहे. मच्छीमारी करणाºया शेतकºयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
या खाडीत २००७ मध्ये श्रीवर्धनमधील जी.ई. सोसायटीज महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागाचे प्रा. नीलेश चव्हाण यांनी केलेल्या सावित्री खाडीच्या सर्वेक्षणामध्ये माशांमध्ये अनेक मेटल असे सापडले की, ते मोठ्या प्रमाणात मानवी शरीराला हानिकारक आहेत. आता येथील प्रदूषणात अधिक वाढ झाल्याने धोका अधिक बळावला आहे.

महाड औद्योगिक क्षेत्राच्या निर्मितीला जवळपास ३० वर्षे उलटून गेली आहेत. या क्षेत्रात सर्वच कारखाने घातक रसायनांचे आहेत. सुरुवातीपासूनच कारखान्यातून पडणारे घातक रासायनिक सांडपाणी सावित्री खाडीत सोडण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात सीओडी असणाºया या पाण्यामुळे संपूर्णपणे खाडी नष्ट झाली आहे. याचाच परिणाम महाड तालुक्यातील नागरिकांना भोगावा लागत आहे. पूर्वापारपासून या खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमारी केली जात असे. या मच्छीमारीवर दासगाव, महाड, केंबुर्ली, वीर, टोळ, दाभोळ, जुई, कुंबळे, वराठी, चिंभावे आणि राजेवाडी अशा अनेक गावांतील दोन ते अडीच हजार नागरिक या खाडीमध्ये मच्छीमारी करून आपला उदरनिर्वाह करत होते. औद्योगिक क्षेत्रातून या खाडीमध्ये सोडल्या जाणाºया पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मरू लागले. यामुळे भोई समाज, आदिवासी समाज आणि मुस्लीम समाज ज्यांचा केवळयाच मच्छीमारीवर उदरनिर्वाह होता, त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. अशा परिस्थितीत या औद्योगिक क्षेत्राचा फायदा कोणाला झाला? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

२००७ मध्ये मी सावित्री खाडीचा सर्व्हे केला होता. भोई माशांचे सॅम्पल तपासले; त्या माशांमध्ये अनेक घटक सापडले. काही घटक मानवी शरीराला सूक्ष्म प्रमाणात गरजेचे आहेत, तर काही घटक हे हानिकारक आहेत. केलेल्या सर्व्हेचा अहवाल यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला सादर केला आहे.
- प्रा. नीलेश चव्हाण

आमच्या सोसायटीचे नाव कृष्णदेव मच्छीमार भोई समाज दासगाव असे असून, आमचा पारंपरिक व्यवसाय माच्छीमारीच आहे. वडिलोपार्जित व्यवसाय असतानाही सावित्री खाडीतील होणाºया प्रदूषणामुळे मच्छीमारी व्यवसाय बंद झाला आहे. याला कारण महाड औद्योगिक क्षेत्रातून सुटणारे रसायन मिश्रीत पाणी; यामुळे मच्छीविक्री होत नाही, आम्हाला याशिवाय कमवण्याचे कोणतेच साधन नाही यामुळे उपासमारीची पाळी आली आहे.
- चंदन मिंडे, मच्छीमार, दासगाव

मच्छीमारी हा वडिलोपार्जित व्यवसाय आहे, गेल्या २० वर्षांपासून मी मच्छीमारी बंद केली, कारण सावित्री खाडीमध्ये महाड औद्योगिक क्षेत्रातून सुटणाºया पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मच्छी मरू लागली, तर मच्छीदेखील मिळण्यास कमी झाली. मच्छी मिळाली तर ग्राहकांनी मच्छी घेण्यास पाठ फिरवली, त्यामुळे वडिलोपार्जित असलेला हा व्यवसाय नाइलाजास्तव बंद करावा लागला आहे.
- पांडुरंग निवाते,
मच्छीमार, दासगाव

२००७ मध्ये प्रा. नीलेश चव्हाण यांचा सर्व्हे
श्रीवर्धनमधील जी. ई. सोसायटीज महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागाचे प्रा. नीलेश चव्हाण यांनी आपल्या अभ्यासक्रमाच्या विषयाप्रमाणे सावित्री खाडीचा सर्व्हे केला.
या खाडीमध्ये अनेक माशांचे सॅम्पल उचलले. यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रमाणाचे हेवी मेटल सापडले. काही मेटल मानवी शरीराला आवश्यक आहेत.
मात्र, प्रमाणात असणे गरजेचे आहे; परंतु या सर्व्हेमध्ये इतर काही मेटल सापडले ते मानवी शरीराला हानिकारक असल्याची बाब समोर येत आहे.
हा सर्व्हे केल्यानंतर नीलेश चव्हाण यांनी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात सादर केला आहे. मात्र, आजपर्यंत या सर्व्हेची शासकीय विभागाकडून दखल घेण्यात आलेली नाही.
या सर्व्हेप्रमाणे मच्छी खाणे मानवी शरीराला धोकादायक असून, अनेक आजाराला निमंत्रण देणारे आहे.

मच्छीमारांना आर्थिक फटका
औद्योगिक क्षेत्रातून निघणारे रासायनिक सांडपाणी पूर्वीच्या सर्व्हेमध्ये पाइपलाइनद्वारे आंबेत गावाच्या पुढे नेऊन खाडीत सोडायचे होते. मात्र, असे न होता महाडपासून काही अंतरावर ओवळे या गावापर्यंत पाइपलाइन थांबवून त्या ठिकाणी हे पाणी सोडण्यात येत आहे. भरती आणि ओहोटीच्या पाण्यामुळे महाडपासून आंबेत या २५ किमीच्या अंतरापर्यंत असणारी सावित्री खाडी ही संपूर्णपणे प्रदूषित झाली असून या भागामध्ये होणारी मासेमारी बंद झाली आहे. त्यामुळे दोन ते अडीज हजार मासेमारी करणाºयांना याचा फटका बसला आहे. आजही या सावित्री खाडीत सोडण्यात येणारे पाणी हे फेसाळत आहे. जर ही पाइपलाइन पूर्वीच्या सर्व्हेप्रमाणे आंबेत गावाच्या पुढे टाकण्यात आली तर मासेमारीचा प्रश्न सुटू शके ल. आजही मासेमारी करण्यासाठी अनेक बँकांतून कर्ज घेऊन जाळी घेणाºयांची जाळी धूळखात पडून आहेत. मच्छीमारी संपल्यामुळे या मच्छीमारांना आर्थिक फटकाही बसला आहे.

Web Title: Due to the chemical waste fish death in Savitri River in Mahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.