कुष्ठरोग नसताना डॉक्टरांनी दिल्या गोळ्या; विद्यार्थिनीचा मृत्यू, वडिलांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 06:15 IST2025-02-03T06:14:23+5:302025-02-03T06:15:09+5:30

पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत ही मुलगी शिकत होती.

Doctor gave pills when she did not have leprosy; Student dies, father alleges | कुष्ठरोग नसताना डॉक्टरांनी दिल्या गोळ्या; विद्यार्थिनीचा मृत्यू, वडिलांचा आरोप

कुष्ठरोग नसताना डॉक्टरांनी दिल्या गोळ्या; विद्यार्थिनीचा मृत्यू, वडिलांचा आरोप

वडखळ : पेण तालुक्यातील वरवणे शासकीय आश्रमशाळेतील चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा कळंबोलीच्या एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. कुष्ठरोगी नसताना कुष्ठरोगी ठरवून चुकीची औषधे दिल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.

खुशबू नामदेव ठाकरे असे त्या मुलीचे नाव असून तिचा २२ जानेवारी रोजी एमजीएम रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आदिवासी विकास विभागाच्या पेण प्रकल्प अधिकारी कार्यालयाने वरवणे येथील शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापक आणि अधीक्षिका यांना करणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत ही मुलगी शिकत होती. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाकरुळ यांनी शासनाच्या कुसुम योजनेंतर्गत १६ डिसेंबर २०२४ रोजी शिबिर घेतले होते. यात तिच्या अंगावर चट्टे असल्याने तिला कुष्ठरोगी ठरवत औषधे सुरू करण्यात आली. 

मात्र, १० जानेवारीनंतर मात्र तिच्या अंगावर फोड उठले, तसेच हातपायांना सूज आली. त्यामुळे तिच्या वडिलांना बोलावून तिला पेण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात पाठवण्यात आले. १६ जानेवारीपासून तिच्यावर उपचार सुरू होते. 

शवविच्छेदनानंतर कारण स्पष्ट

त्या मुलीला देखरेखीसाठी एमजीएममध्ये दाखल करण्यात आले होते. आमच्यावर पालकांनी आरोप केलेले नाहीत. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. संबंधित प्रकरणाचे कागदपत्र संबंधित आश्रमशाळा, पालिका, पंचायत समितीला उपलब्ध करून दिली आहेत, असे एमजीएम रुग्णालयाचे समाजसेवक एकनाथ बागुल यांनी सांगितले.

आरोग्य शिबिरात तिला कुष्ठरोग असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आरोग्य केंद्राने दिलेल्या गोळ्या देत होतो. ताप आल्याने वाकरूळ आरोग्य उप केंद्रात मुलीला दाखल केले. -अजित पवार, मुख्याध्यापक, शासकीय आश्रमशाळा, वरवणे. 

Web Title: Doctor gave pills when she did not have leprosy; Student dies, father alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.