कोकण पदवीधर मतदारसंघात २० हजार मतदारांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 06:50 AM2018-05-08T06:50:11+5:302018-05-08T06:50:11+5:30

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक रंगात आली असताना आता कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूकदेखील तोंडावर आली आहे. ही निवडणूक येत्या ३0 जून रोजी होणार आहे. मात्र, या वेळी पदवीधर मतदारांमध्ये तब्बल २० हजारांनी घट झाली आहे.

 Decrease of 20 thousand voters in Konkan Graduate Constituency | कोकण पदवीधर मतदारसंघात २० हजार मतदारांची घट

कोकण पदवीधर मतदारसंघात २० हजार मतदारांची घट

Next

- अमुलकुमार जैन
बोर्लीमांडला : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक रंगात आली असताना आता कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूकदेखील तोंडावर आली आहे. ही निवडणूक येत्या ३0 जून रोजी होणार आहे. मात्र, या वेळी पदवीधर मतदारांमध्ये तब्बल २० हजारांनी घट झाली आहे.
शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मतदार नोंदणीसाठी मोठी मोहीम राबविली होती. परंतु, मतदारांमध्ये फारशी वाढ झाली नाही. उलट गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा २० हजार मतदार घटले आहेत. पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे कोकण पदवीधर मतदारसंघात येतात. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघात १ लाख ९ हजार मतदार नोंदणी झाली होती. आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत ९० हजार २५२ इतकी मतदार नोंदणी झाली आहे. त्यामुळे सुमारे २० हजारांनी पदवीधर मतदार संख्या घटली आहे. पदवीधर मतदारांमध्ये असलेल्या मतदानाविषयी निरु त्साह या माध्यमातून स्पष्ट झाला आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघ १९८८ मध्ये अस्तित्वात आला. यावेळी केवळ ६ हजार मतदार नोंदणी झाली होती. त्यावेळी ठाणे येथील भाजपाचे उमेदवार वसंत पटवर्धन विजयी झाले होते. १९९४ मध्ये या मतदारसंघात १२ हजार मतदार नोंदणी झाली. मतदार दुप्पट वाढले. त्यावेळी डॉ. अशोक मोडक आमदार म्हणून निवडून आले. २००६ साली तब्बल ६६ हजार मतदार नोंदणी झाली. त्यावेळी भाजपाचे संजय केळकर यांनी राष्ट्रवादीचे नीलेश चव्हाण यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव केला होता तर २०१२ मध्ये पदवीधर मतदार वाढले त्यासाठी राष्ट्रवादीने जोर लावला आणि मतदार संख्या १ लाख ९ हजारांवर गेली. यावेळी राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांना २७,६३३ तर भाजपाचे संजय केळकर यांना २२ हजार ९२ मते मिळाली आणि डावखरे ५६४१ मतांनी विजयी झाले. पारंपरिक भाजपाकडे असलेला हा मतदारसंघ राष्ट्रवादीने आपल्याकडे खेचून आणला. आता जून २०१८ मध्ये याच मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्यामुळे सत्तेत असलेली भाजपा पुन्हा एकदा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे डावखरे यांच्यासमोर आव्हान उभे आहे.
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील पालघर जिल्ह्यात १५,१३५ , ठाणे जिल्ह्यात ३७,२५४, रायगड जिल्ह्यात २४,१५८ , रत्नागिरी जिल्ह्यात १५,५०७, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५८७ पदवीधर मतदार नोंदणी झाली आहे. ही निवडणूक ३० जून रोजी होणार असून निवडणूक यंत्रणा कामाला लागली आहे.

भाजपा ताकद लावणार

कोकण पदवीधर मतदारसंघात निवडणूक चुरशीची होणार आहे. राष्ट्रवादीतर्फे निरंजन डावखरे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. भाजपातर्फे मिलिंद पाटणकर, डॉ. राजेश मढवी, डॉ. विनय नातू, संदीप लेले, नीलेश चव्हाण ही नावे आहेत. शिवसेनेकडून माजी महापौर संजय मोरे, वरुण देसाई, नरेश म्हस्के यांची नावे चर्चेत आहेत. हातातून गेलेला मतदारसंघ पुन्हा मिळविण्यासाठी भाजपा ताकद लावणार आहे.

Web Title:  Decrease of 20 thousand voters in Konkan Graduate Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.